पुणे - एल्गार परिषदेचे प्रकरण हे बनावट आहे. त्याबद्दलचे पत्र शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले होते. ही कागदपत्रे शरद पवारांनी सार्वजनिक करावीत. केंद्रातील मोदी सरकारच्या कारभाराचा पर्दाफाश करावा, अशी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना विनंती केली आहे.
शरद पवार यांनी कागदपत्रे सार्वजनिक केली तर केंद्र सरकार लोकशाहीचा आवाज कसा दाबत असल्याचे कागदपत्रांवरून उघडकीस येईल. त्यामुळे शरद पवारांना विनंती आहे, की त्यांनी बोगस कागदपत्रे सार्वजनिक करावीत, अशी विनंती वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
पुढे आंबेडकर म्हणाले, की एल्गार परिषदेचे आयोजन सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश पी.बी. सावंत यांनी केले होते. केंद्र सरकारमध्ये राष्ट्रीय स्वंयसेवक संघ व भाजपचे सरकार आल्यानंतर त्यांनी एल्गार परिषदेला बदनाम केले. एल्गार परिषदेच्या निमित्ताने केंद्राने राजकारण केले आहे. या प्रकरणाचा तपास चुकीच्या पद्धतीने करण्यात आला आहे. नको असलेले कायदे या ठिकाणी लावण्यात आले. हे सुरू असतानाच, राज्यात देवेंद्र फडणवीसांची सत्ता गेली. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे की, एल्गार प्रकरण बोगस आहे. संबंधित कागदपत्रे बनावट तयार करण्यात आली आहेत. त्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, असे पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. या प्रकरणातील खोटी कागदपत्रे तयार करण्यात आल्याचे पवारांना माहित झाले आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या विनंतीला शरद पवार हे मान देतील, अशी अपेक्षाही बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे.
काय आहे एल्गार प्रकरण?
पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी पार पडलेल्या एल्गार परिषद आयोजनात नक्षलवादी संबंध असल्याच्या कारणावरून आतापर्यंत देशभरातून तब्बल १२ जणांना अटक करण्यात आली आहे. कोरोगाव भीमा येथील लढाईस २०० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पुण्यातील शनिवारवाडा येथे एल्गार परिषदचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी नक्षलवादी संघटनांनी आर्थिक पुरवठा करण्यासोबतच लोकांना चिथावणी दिल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे.