पुणे - 30 जानेवारी रोजी पुण्यात पार पडलेल्या एल्गार परिषदेत हिंदू धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी विद्यार्थी नेता शर्जील उस्मानी याच्याविरोधात पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल आहे. दरम्यान शर्जील उस्मानीने या प्रकरणी न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामीन मिळवला आहे. परंतु त्याला पोलिसात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले होते. त्यानुसार शर्जील उस्मानी आज पुन्हा एकदा स्वारगेट पोलिसांसमोर हजर झाला. सकाळी साडे दहा ते साडे अकरा यावेळेस तो पोलिसांसमोर हजर होता. पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून घेतला.
काय आहे प्रकरण -
पुण्यात 30 जानेवारी रोजी एल्गार परिषद पार पडली. या एल्गार परिषदेत शर्जील उस्मानी याने हिंदू धर्माविरोधात वक्तव्य केले होते. 'हिंदुस्तान मे हिंदू समाज पूरी तरह से सड चुका है' असे वादग्रस्त वक्तव्य त्याने केले होते. त्यानंतर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने आक्रमक रूप धारण करत शर्जील उस्मानी याला अटक करण्यात यावी, या मागणीसाठी ठिकठिकाणी आंदोलने केली होती. त्यानंतर स्वारगेट पोलrस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर शर्जील उस्मानी याला अटक करण्यासाठी स्वारगेट पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत होते. परंतु तो सापडत नव्हता. परंतु पोलीस आपल्या मागावर असल्याचे लक्षात आल्यानंतर उस्मानी याने अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर न्यायालयाने ही त्याच्यावर कारवाई करू नका असे म्हणत त्याला पुणे पोलिसांकडे हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार याआधीही शर्जील उस्मानी पुणे पोलिसात हजर झाला होता. त्यानंतर आज देखील (गुरुवारी) स्वारगेट पोलिसांकडे हजर झाला. पोलिसांनी तपासाच्या दृष्टीने त्याची चौकशी करून जबाब नोंदवला आहे. 22 मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे. त्यानुसार पुढील कारवाई होणार आहे.
हेही वाचा - 'वकिलांशी भेटीच्यावेळी एनआयए अधिकाऱ्यांची उपस्थिती नको', वाझेंची विशेष न्यायालयात याचिका