पुणे - कोकेन या अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या एका नायजेरियन व्यक्तीला पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातून 5 लाख 29 हजार रुपये किंमतीचे 52 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. ओलमाईड क्रिस्तोफर कायोदे (वय 42) असे अटक करण्यात आलेल्या नायजेरियन तस्कराचे नाव आहे.
'उंद्री परिसरात एक नायजेरीयन व्यक्ती घरातून कोकेन विक्री करत असल्याची माहिती' -
याप्रकरणी अधिक माहिती अशी, की शहरात बेकायदेशीर धंदे करणारे, अंमली पदार्थ विक्रीचे रॅकेट चालविणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून त्यांना पायबंद घालण्याच्या सूचना पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिल्या होत्या. त्यानुसार अमली पदार्थ विरोधी पथकाचे कर्मचारी शहरातील उंद्री परिसरात गस्त घालत होते. यावेळी पोलीस अमलदार योगेश मोहिते यांना उंद्री परिसरात एक नायजेरीयन व्यक्ती राहत्या घरातून कोकेन या अंमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती.
'सापळा रचून घेतले ताब्यात' -
माहितीची खातरजमा करून अमली पदार्थ विरोधी पथकाने संबंधित व्यक्तीला पकडण्यासाठी सापळा रचला होता. त्यानंतर कुंडली येशील भक्ती प्राइड सोसायटीतील फ्लॅट नंबर 102मध्ये छापा टाकला. यावेळी आरोपी ओलमाईड कायोदे त्याच्या घरातून पोलिसांनी 52 ग्रॅम 980 मिलिग्राम कोकेन जप्त केले. याशिवाय त्याच्या ताब्यातील 3 मोबाइल फोन, इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा एकूण पाच लाख 36 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.