पुणे - बुधवार पेठेतील भरवस्तीत असलेल्या इलेक्ट्रिक वस्तूंच्या गोडाउनच्या खिडकीची लाकडी फ्रेम तोडून आत प्रवेश करुन २५ लाखाच्या इलेक्ट्रिक वस्तू चोरून नेणाऱ्या ६ जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चोरीला गेलेल्या वस्तुंसह ३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.
अक्षयकुमार श्रीमेवालाल सरोज (२०), विनयकुमार विरेंद्रनारायण सरोज (२०), राहुल रामसंजीवन सरोज (१९), निरजकुमार मेघाई सरोज (१९), सुनीलकुमार श्यामसुंदर सरोज (२४) आणि अरविंदकुमार प्यारेलाल सरोज (१९), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपी मूळचे उत्तरप्रदेशातील असून सध्या पुण्यातील मंगळवार पेठेत राहत होते.
दिपक रमेश वाधवाणी यांचे पुण्यातील बुधवार पेठेतील इलेक्ट्रिक वस्तूंचे गोडाऊन ६ जुलैच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फोडले होते. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मध्ये एक पॅगो टेम्पो दिसून आला. त्यानुसार पोलिसांनी टेम्पो चालकास ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता त्याने इतर साथीदारांसह गुन्हा केल्याचे कबूल केले. चोरी पकडली जाऊ नये यासाठी आरोपीनी चोरी करतेवेळी टेम्पोचा मूळ रंग आणि नंबर प्लेट बदलला होता. चोरी झाल्यानंतर त्यांनी टेम्पो परत पूर्ववत करुन ठेवला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.