पुणे - सात ते आठ दवाखाने फिरल्यानंतरही बेड उपलब्ध न झाल्यामुळे धायरीतील एका रुग्णाने मंगळवारी रात्री कुटुंब आणि मित्रांसह अलका चौकात ठिय्या आंदोलन केलं होतं. त्यानंतर या रुग्णाला विश्रांतवाडीतील एका रुग्णालयात अॅडमिट करण्यात आलं होतं. परंतू, त्या रुग्णाचा आज (बुधुवार) दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर पुण्यातील आरोग्यव्यवस्था किती ढासळली याचं आणखी एक उदाहरण समोर आले आहे. धायरीतील मनोज कुमार (वय 34) या तरुणाला ऑक्सीजन बेड मिळवण्यासाठी चक्क आंदोलन करण्याची वेळ आली. सकाळी 11 पासून ते रात्री 9 वाजेपर्यंत या रुग्णाने वेगवेगळी सात रुग्णालयं पालथी घातली परंतू, त्याला ऑक्सीजन बेड मिळालाच नाही. यानंतर संतापलेल्या या रुग्णाच्या कुटुंबीयांनी पुण्यातील मध्यवस्तीत असणाऱ्या अलका चौकात या रुग्णासह आंदोलनाला सुरुवात केली. त्यानंतर जाग आलेल्या प्रशासनाने धावाधाव करीत या रुग्णासाठी बेडची व्यवस्था केली. मात्र, उपचारादरम्यान आज त्या रुग्णाचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे पुण्यातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा कसा उडालाय याचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वी व्हेंटिलेटर बेड उपलब्ध न झाल्यामुळे एका निवृत्त शास्त्रज्ञाचा मृत्यू झाला होता. त्या घटनेतून प्रशासनाने कुठलाही धडा घेतला नसल्याचे या घटनेतून उघड झाले आहे.
प्रकरणाच्या चौकशीचे महापौरांचे आदेश
दरम्यान, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे सांगितले. पुण्यासारख्या शहरात अशाप्रकारची घटना घडणे खेदजनक असल्याचे त्यांनी सांगितले. हा रुग्ण पाच ते सहा रुग्णालयात जाऊन आल्यानंतरही त्याला ऑक्सिजन बेड का मिळाला नाही? याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. कालची परिस्थिती पाहता शहरातील महापालिकेच्या अथवा खासगी रुग्णालयात ऑक्सिजन बेड नाहीतच अशी परिस्थिती नव्हती. त्यामुळे असा प्रकार का घडला याची चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. यामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे मोहोळ यांनी सांगितले.