पुणे - कोरोनाच्या संकटामुळे मागील पाच महिन्यांपासून ठप्प असलेली 'पीएमपीएमएल'ची सेवा आजपासून पिंपरी चिंचवड शहरात सुरू झाली आहे. दरम्यान, तिकीटात कोणतीही वाढ करण्यात आलेली नसून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातून वडगाव मावळ आकुर्डी रेल्वे स्थानक किवळे, तळेगाव, भोसरीसह भक्ती- शक्ती चौकातून चाळीस बसेस शहरात फेऱ्या मारणार आहेत.
पिंपरी चिंचवडमध्ये बस सेवा सुरू अत्यावश्यक सेवेसाठी पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी बसेस आधीपासूनच धावत होत्या. आता उर्वरित अडीचशे बसेसचा ताफा सेवेसाठी तयार करण्यात आला आहे. बसमध्ये एकावेळी सतरा प्रवाशांना प्रवासाची परवानगी असेल. आठ महिला व नऊ पुरुषांचा समावेश असेल, अशी माहिती पीएमपीएमएल प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. 65 वर्षांपुढील ज्येष्ठ आणि दहा वर्षांच्या आतील मुलांना बसमध्ये प्रवेश नाही. मास्क लावूनच बसावे, बसमध्ये कॉइन बॉक्स ठेवण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या पाच महिन्यापासून या कर्मचाऱ्यांना काम नव्हते. त्यामुळे आता रोजंदारी करणाऱ्या व्यक्तींना काम मिळणार आहे. यानिमित्ताने पिंपरी-चिंचवड शहर हळूहळू पूर्वपदावर येत आहे.
हेही वाचा - COVID -19 : मोबाईल, इंटरनेट, लॅपटॉप, संगणकाअभावी ऑनलाईन वर्ग 'नापास'