पुणे - पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील जीर्ण जुन्या इमारती व वाडे यांचा बिकट प्रश्न समोर आल आहे. मुंबईमध्ये इमारत पडण्याच्या घटनेनंतर या प्रश्नाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. पुण्याचा विचार केला तर पेठांमध्ये असलेले जुने वाडे अधिक धोकादायक आहेत.
महापालिकेने पुणे शहरात असलेल्या जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींवर कारवाई सुरू केली आहे. अशा इमारतीमधील रहिवाशांना महापालिकेने नोटीस पाठविल्या आहेत. पावसाळ्याच्या आधी महापालिकेने ही कारवाई सुरू केली. महापालिकेने अशा 159 इमारतींना नोटीस पाठविली आहे.
हेही वाचा-Corona Deaths : काल सर्वाधिक 6 हजार 148 लोकांचा मृत्यू, अजूनही दुसरी लाट ओसरली नसल्याचा पुरावा
4 इमारती पाडल्या -
शहरात पूर्णपणे मोडकळीस आलेले 4 वाडे पाडण्यात आले आहेत. तर इतर धोकादायक इमारती खाली करून त्यांची डागडुजी करण्याच्या सूचना महापालिकेने दिल्या आहेत. राज्य सरकारच्या नियमाप्रमाणे धोकादायक इमारती या तीन गटांमध्ये विभागण्यात येतात. यात अतिधोकादायक, राहण्यास अयोग्य व तात्काळ त्या इमारती पाडणे या पहिल्या वर्गवारीत यावर्षी शहरात 4 इमारती होत्या.
हेही वाचा-देवेंद्र फडणवीसांच्या पुतण्याने आरोग्य कर्मचारी म्हणून घेतली लस, माहिती अधिकारात पुढे आली धक्कादायक बाब
दुरुस्तीच्या सूचना -
दुसऱ्या वर्गवारीत इमारत रिकामी करून ती दुरूस्त करण्याच्या सूचना दिल्या जातात. पुण्यातल्या शनिवार पेठ, नारायण पेठ, कसबा पेठ, रास्ता पेठ, बुधवार पेठ यासारख्या पेठांमधील 155 अशा इमारतींवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच यातील 29 इमारतींचा धोकादायक भाग पाडण्यात आला आहे. तर 56 मिळकती या तात्काळ दुरूस्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मालाडमध्ये तीन मजली इमारत कोसळून 11 जणांचा मृत्यू
मालाडच्या मालवणी भागात एका रहिवाशी भागात एक तळमजला सोडून तीनमजली इमारत शेजारील घरावर कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला. तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. मालाडमधील मालवणी गेट क्र. 8 येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात बुधवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. पहिल्याच पावसात घडलेल्या या दुर्घटनेमुळं आपली पोलखोल होऊ नये म्हणून सर्वंच राजकीय मंडळी एक दुसऱ्यांवर अनधिकृत बांधकामाचं प्रकरण ढकलून खापर फोडत आहेत.