पुणे - पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 6 मार्च रोजी पुणे दौऱ्यावर येत आहेत. तसेच येथील विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी 11 वाजता पंतप्रधान मोदी हे पुणे महानगरपालिकेच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. सकाळी साडेअकरा वाजता पंतप्रधानांच्या हस्ते पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत. पुण्यातील नागरी गतिशीलतेसाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणारा हा प्रकल्प आहे.
पंतप्रधानांचा असा असेल दौरा -
पंतप्रधानांच्या हस्ते 24 डिसेंबर 2016 रोजी या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती. एकूण 32.2 किमी लांबीच्या पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या 12 किमी लांब मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. हा संपूर्ण प्रकल्प 11,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधला जात आहे. ते गरवारे मेट्रो स्थानकात प्रदर्शनाचे उद्घाटन आणि पाहणी करतील आणि आनंदनगर मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास करतील. दुपारी 12 वाजता पंतप्रधान एमआयटी कॉलेज येथील ग्राउंडवर अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील.
एक शहर एक ऑपरेटर प्रकल्पाचे उद्घाटन -
मुळा-मुठा नदी प्रकल्पांच्या पुनरुज्जीवन आणि प्रदूषण निवारणाची पायाभरणीही ते करणार आहेत. नदीच्या 9 किमी पट्ट्यात 1080 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करून पुनरुज्जीवन केले जाईल. यामध्ये नदीकाठचे संरक्षण, सांडपाणी व्यवस्थापन (इंटरसेप्टर सीवेज नेटवर्क), सार्वजनिक सुविधा, नौकाविहार सुविधा इत्यादी कामांचा समावेश असेल. मुळा-मुठा नदीचे प्रदूषण कमी करणारा प्रकल्प 1470 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चासह “एक शहर एक ऑपरेटर” या संकल्पनेवर राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण 11 सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बांधले जातील, त्यांची एकत्रित क्षमता सुमारे 400 एमएलडी असेल.
बाणेर येथे ई बस डेपो लोकार्पण -
बाणेर येथे 100 ई-बस आणि ई-बस डेपोचेही पंतप्रधान लोकार्पण करतील. पुण्यात बालेवाडी येथे बांधण्यात आलेल्या आरके लक्ष्मण आर्ट गॅलरी-संग्रहालयाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या संग्रहालयाचे मुख्य आकर्षण म्हणजे मालगुडी गावावर आधारित छोटेखानी प्रतिकृती (मॉडेल) आहे जी ऑडिओ-व्हिज्युअल इफेक्ट्सच्या माध्यमातून जिवंत केली जाणार आहे. व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांनी काढलेली व्यंगचित्रे संग्रहालयात प्रदर्शित करण्यात येणार आहेत. यानंतर, दुपारी 1:45 वाजता, पंतप्रधान सिम्बायोसिस विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचा प्रारंभ करतील.
पुणे महानगरपालिकेची निवडणूक आणि दौरा -
येत्या मार्च महिन्यात आताच्या महापालिकेचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे मार्च महिन्यातच पुणे महापालिकेच्या निवडणुकीच बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी पंतप्रधानांचा पुणे दौरा होत आहे. त्यामुळे हा दौरा नेमके पुण्याच्या राजकारणात मोठा परिणाम करणार असेल अशी राजकीय विश्वात चर्चा सुरू आहे.
या दोन मतदार संघात मोदींचा झंझावात -
आपल्या या संपूर्ण कार्यक्रमादरम्यान नरेंद्र मोदी हे पुण्यातील मुख्य दोन मतदार संघात जातील. जर विधानसभेच्या दृष्टीने विचार केला तर मोदी प्रामुख्याने शिवाजी नगर मतदार संघ आणि कोथरूड विधानसभा मतदार संघ या दोन मुख्य मतदार संघात मोदी येणार आहेत. सद्यपरिस्थितीत हे दोन्ही मतदार संघ भाजपच्या ताब्यात आहेत. कोथरूडमधून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेच आमदार आहेत. शिवजी नगर मतदार संघात देखील भाजपचे शिरोळे हेच आमदार आहेत. हे दोन्ही मतदार संघ पारंपरिक भाजपचेच राहिले आहेत.
पुणे महापालिकेची रणनीती -
दुसरीकडे २०१७मध्ये भाजपने पुणे महापालिकेत १००पेक्षा अधिक जागा मिळवत पालिकेवर एक हाती सत्ता मिळवली. आणि येणाऱ्या निवडणुकीत देखील भाजप पुन्हा एकदा पुणे महपिलकेत सत्तेत येणार असल्याचे भाजप नेत्यांकडून सांगितले जात आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस देखील पुन्हा सत्तेत येण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा भाजपला नेमका कसा उपयोगी पडतो हे पाहण महत्वाचे ठरणार आहे.