पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 6 मार्च ( रविवार ) पुणे दौऱ्यावर येणार ( PM Modi In Pune Visit ) आहेत. पंतप्रधान मोदी कर्वे रस्त्यावरील गरवारे महाविद्यालय येथे पुणे मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन आणि मेट्रोने आनंदनगपर्यंतचा प्रवास ( PM Modi Inaugurate Metro Rail Station ) करतील. नंतर ते पुणेकरांना संबोधित करणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यानिमित्त पुणे मेट्रो स्टेशनवर जय्यत तयारी करण्यात आली आहे.
गरवारे परिसरात बंदोबस्त
पंतप्रधानंच्या सुरक्षेसाठी आज ( शनिवार ) पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पहाणी केली. त्यानंतर तिथे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्थानकात येणाऱ्या कर्मचार्यापासून अधिकारी, स्वच्छता कामगारांची नोंदणी केली जात आहे.
हायटेक वास्तुकला
पुणे शहराचे शहरीकरण, परदेशातील हायटेक वास्तुकला आणि भारतीय चित्रपटांचे ऐतिहासिकरण या मेट्रो स्थानकात पाहता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रोच्या पहिल्याटप्प्याचे उद्धाटन करतील. उद्घाटन केल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत नागरिकांना मेट्रोने प्रवास करता येणार आहे.
अशी असतील पुण्यातील मेट्रो स्टेशन
गरवारे महाविद्यालय मेट्रो स्टेशन -
शहरातील प्रसिद्ध गरवारे महाविद्यालयासमोरच हे मेट्रोचे स्थानक आहे. महाविद्यालयीन तरूणाईसाठी अतिशय महत्वाचे असे हे स्थानक असून, पुर्णत: सोलर एनर्जीवर चालविण्यात येणार आहे.
नळस्टॉप मेट्रो स्टेशन -
फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि नॅशनल फिल्म आर्काइव्ह या चित्रपट क्षेत्रातील शासकीय संस्थांच्या जवळ नळ स्टॉप मेट्रो स्टेशन आहे. त्यामुळे या मेट्रो स्टेशनची रचना पाहता, भारतीय चित्रपटांच्या ऐतिहासिकतेच्या आठवणींना उजाळा मिळणार आहे. तसेच, हे स्टेशन पुण्याच्या सांस्कृतिक वैशिष्ट्यात लक्षणीय भर घालणार आहे.
आयडीयल कॉलनी मेट्रो स्टेशन -
आयडीयल कॉलनी मेट्रो स्टेशनची रचना हायटेक मेट्रो ट्रेन प्रमाणेच असणार आहे. याला पाहिले असता परदेशात आल्याचा अनुभव पुणेकरांना होणार आहे. संपुर्ण ग्रीन एनर्जीवर या स्टेशनचे कामकाज चालणार आहे. या मेट्रो स्थानक परिसरात दाट लोकवस्ती असल्यामुळे या स्टेशनचा नक्कीच फायदा होणार आहे.
आनंद नगर मेट्रो स्टेशन -
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटनाच्या दिवळी गरवारे कॉलेज ते आनंद नगर या मेट्रो स्थानकांदरम्यान प्रवास करतील. गरवारे मेट्रो स्थानकाप्रमाणेच त्याची रचना आहे. या स्थानकाचा फायदा चाकरमान्यांसह विद्यार्थी वर्गाला देखील होणार आहे. मेट्रोचे हे स्टेशन सुद्धा सोलर एनर्जीवर असेल.
वनाझ मेट्रो स्टेशन -
वनाझ - रामवाडी कॉरिडॉरचे टर्मिनल असे हे स्टेशन असेल. या स्टेशनच्या जवळच हिल व्ह्यु पार्क कार डेपो असणार आहे. याठिकाणी मेट्रोच्या गाड्या रात्रीच्या वेळी पार्क असतील.