पुणे - घरफोड्या करणाऱ्या टोळीला पिंपरी-चिंचवड दरोडा पथकाने जेरबंद केले असून त्यांच्याकडून 30 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पाच चारचाकी वाहन, चार दुचाकी, 17 तोळे सोन्याचे दागिने आणि एक किलो चांदी असा मुद्देमाल दरोडा पथकाने जप्त केला आहे. याप्रकरणी दोन सख्ख्या भावांना पोलिसांनी जेरबंद केले आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली आहे. सूरजितसिंग राजपालसिंग टाक (वय 32) आणि जितसिंग राजपालसिंग टाक (वय 26) अशी अटक करण्यात आलेल्या संख्या भावाची नावे आहेत.
भोसरी इंद्रायणी भागात घरफोडीच्या तयारीत असलेले आरोपी जेरबंद
दरोडा विरोधी पथकातील पोलीस उपनिरीक्षक भांगे यांना माहिती मिळाली होती, की संबंधित आरोपी हे भोसरी परिसरातील इंद्रायणी नगर भागात येणार आहेत. आरोपी हे सराईत गुन्हेगार असून ते घरफोड्या करत असल्याची माहिती त्यांना होती. त्यानुसार, सापळा रचून आरोपींना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, तीन आरोपी पसार होण्यास यशस्वी झाले तर दोघे सराईत सख्खे भाऊ पोलिसांच्या हाती लागले.
दोन्ही सराईत गुन्हेगारांवर दाखल आहेत 48 गुन्हे
आरोपींना ताब्यात घेऊन मोटारीची झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन लोखंडी कोयते, कटावणी, घेऊन ते इंद्रायणी नगर याठिकाणी असलेल्या वैष्णवी माता कॉलनी येथे दरोडा टाकणार असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. सराईत दोन्ही गुन्हेगारांवर एकूण 48 गुन्हे दाखल आहेत. सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे यांच्या पथकाने केली आहे.