पुणे : राज्यात पेट्रोलच्या दराने अनेक ठिकाणी शंभरी गाठली आहे, तर काही ठिकाणी पेट्रोलचे दर शंभरी पार गेले आहेत. पुण्यातही पेट्रोल शंभरी जवळ पोहचले आहे. रात्रीच्या दरवाढीनंतर शनिवारी पुण्यात पेट्रोलचे दर 99.87 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. सातत्याने वाढणाऱ्या इंधन दरांवर सामान्यांमधून मात्र नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.
13 पैशांनी हुकली शंभरी
पुण्यात पेट्रोलचा आजचा दर हा 99.87 रुपये प्रति लिटर वर जाऊन पोहोचला आहे. सध्या तरी 13 पैशांनी पुण्यात पेट्रोलची शंभरी हुकली आहे. मात्र लवकरच पुण्यातही पेट्रोल शंभरी पार होईल अशीच चिन्हे आहेत. पॉवर पेट्रोलचे दर या आधीच शंभर रुपये प्रति लिटरच्यावर पोहोचले आहेत. पेट्रोल दरवाढ सध्या सामान्य नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत. पुण्यात गेल्या आठवड्यापासून पेट्रोलच्या दरांमध्ये वाढ सुरूच आहे. पुण्यात गेल्या आठवड्यात पेट्रोलचे दर 99.31 रुपये इतके होते. आता त्यात वाढ होऊन पेट्रोल 99.87 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत.
पेट्रोल दरवाढीवर सामान्यांची नाराजी
सातत्याने होणाऱ्या पेट्रोल दरवाढीवरून सरकारविषयी नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. पेट्रोलची मूळ किंमत साधारण 40 रुपयांच्या आसपास असताना 100 रुपये दराने आम्हाला पेट्रोल का मिळत आहे असा सवाल सामान्य नागरिक विचारताना दिसत आहेत. मूळ किंमतीवर केंद्र सरकारकडून लावला जाणार कर आणि त्यानंतर राज्य सरकारकडून लावला जाणारा कर, त्यावर व्हॅट यामुळे पेट्रोलच्या किंमती गगनाला भिडल्याचे सांगतानाच केंद्र आणि राज्य सरकार दोघांनी कर कमी केले तरी पेट्रोल ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल अशी प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. राज्यात पेट्रोलवरील 2 रुपये प्रति लिटर दुष्काळ कर अजुनही सुरू असून गेल्या वर्षी कोरोनाच्या निमित्ताने केंद्र आणि राज्य सरकारने अधिभार लावला आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य दोघांनी कर कमी करण्याची गरज असल्याचे मत सामान्यांमधून व्यक्त होत आहे.
हेही वाचा - मुंबईत आज पुन्हा पेट्रोल शंभरी पार!