पुणे - लॉकडाऊनमुळे राज्यात व राज्याबाहेर अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी,तसेच इतर नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी राज्य शासनाने धोरण निश्चित केले आहे. जिल्हाधिकारी यांच्या परवानगीचे पत्र असेल तरच अडकलेल्या नागरिकांना स्थलांतर करण्याची परवानगी दिली जाईल. या वृत्तानंतर पुणे तहसीलदार कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात कामगार, विद्यार्थी व इतर नागरिकांनी गर्दी केली होती. तहसीलदार पुणे यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.
सकाळपासून अर्ज भरण्यासाठी नागरिक तहसीलदार कार्यालयाबाहेर गर्दी करू लागले. वाढत असलेली गर्दी पाहता स्थानिक खडक पोलिसांकडून या नागरिकांची नोंदणी करण्यास सुरवात करण्यात आली.ज्याला जशी माहिती मिळत गेली तसतशी तहसीलदार कार्यालयाबाहेर गर्दी वाढत गेली.
पुणे शहर कॅटेन्टमेंट झोनमध्ये असल्याने कुठल्याही नागरिकाला पुण्याबाहेर किंवा पुण्यात येता येणार नाही, असे तहसीलदार तृप्ती पाटील यांनी स्पष्ट केले. शहरातील नागरिकांना याचा विसर पडल्याने ते गर्दी करत आहेत.स्थलांतरासाठी काहीही सूचना आलेल्या नाहीत.काही सूचना आल्यास नागरिकांना कळवण्यात येईल. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका. ज्या ज्या वेबसाईट देण्यात आले आहे त्या वेबसाईटवर नोंदणी करावी, अशी माहिती पाटील यांनी दिली.
स्थलांतराच्या विषयानंतर बाहेरुन आलेले कामगार विदयार्थी यांच्या आशेचा किरण निर्माण झाला. मात्र, प्रशासनाकडून वेगवेगळी माहिती मिळत असल्याने प्रशासनामध्ये सन्वय नसल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.