पुणे - कोरोनाच्या महासंकाटात नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कोणाची नोकरी धोक्यात आहे, तर कोणाचा व्यवसायच बंद आहे. अनेकांसमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहे. मात्र, यापेक्षाही भयावह चित्र बेघर नागरिकांचे झाले आहे. लॉकडाऊनच्या सुरुवातीला या लोकांना विविध सामाजिक संस्था संघटना मदत करत होते. पण, आता नव्याने जाहीर करण्यात आलेल्या या लॉकडाऊनमध्ये या लोकांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे.
महापालिका किंवा इतर सामाजिक संस्थांकडून या लोकांना फक्त एक वेळचे जेवण दिले जात आहे. सकाळी दिलेल्या जेवणानंतर हे लोक दिवसभर किंवा सायंकाळी कोणी मदतीला येईल का? याचीच प्रतीक्षा करत असतात. अनेक लोकांसमोर लॉकडाऊनमध्ये कितीतरी प्रश्न निर्माण झाले असले, तरी ते दोन वेळ जेवण करत आहे. मात्र, हे बेघर लोकांना ना अन्न, ना पाणी; ना कोणाला नोकरी मिळत आहे. आम्हाला नोकरी करायची इच्छा असली तरी या लॉकडाऊनमध्ये कोणी नोकरी देत नाहीये. पैसे नको फक्त दोन वेळचे जेवण द्या, या आशेने नोकरीसाठी गेलो तरी नोकरी मिळत नाही, अशा भावना येथील लोकांनी व्यक्त केल्या आहेत.
सुरुवातीला अडचणीत सापडलेल्या आपल्या बांधवांना मदत करण्यास शासन-प्रशासन, स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्था, राजकीय पक्ष, डॉक्टर-केमिस्ट-मेकॅनिक यांच्या संघटना, हॉटेल मालक, किराणा दुकानदार, शेतकरी गट, सर्वसामान्य व्यक्ती आपापल्यापरीने उतरले होते. पण आता या लॉकडाऊनमध्ये या सामाजिक संस्था, संघटनांचे मदत कार्य कमी झाले आहे. पुणे शहारत मोठ्या प्रमाणात बेघर नागरिक आहेत. शहराच्या अनेक भागात हे बेघर नागरिक फूटपाथवर राहत असतात. हॉटेल्स, पथारी, चहाच्या दुकानात किंवा मिळेल ते काम हे लोक करत असतात आणि जीवन जगत असतात. लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले असले, तरी कोरोनाच्या या महासंकटात या बेघर लोकांना मोठ्या प्रमाणात अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. कोणीतरी येऊन काहीतरी मदत करेल, याच प्रतीक्षेत हे लोक बसलेले असतात. पण दुर्दैव की काय लोकांना एक वेळचे जेवण मिळत असून एक वेळ उपाशी बसावे लागत आहे.