पुणे - येथील बिबेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत माधव वाघाटे या सराईत गुन्हेगाराचा व्हाट्सएॅप स्टेटसच्या वादातून दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (दि. 14 मे) रात्री घडली होती. याच गुन्हेगाराच्या अंत्यविधीसाठी मोठा जमाव जमल्याचे उघडकीस आले आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी केवळ 25 जणांना परवानगी असताना इतका मोठा जमाव कसा जमला, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. या संपूर्ण प्रकारामुळे पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
परंतु शनिवारी (दि. 15 मे) माधव वाघाटे याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने गर्दी जमली होती. तर 100 हून अधिक दुचाकीने अंत्ययात्रेमध्ये तरुणांनी रॅली देखील काढली होती. चौकाचौकात पोलिसांची नाकाबंदी असतानाही इतक्या मोठ्या संख्येने नागरिक एकत्र आलेच कसे हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
कडक निर्बंध असतानाही तडीपार गुंड शहरात येऊन बिनधास्त फिरत आहेत. तडीपार गुंडांनी पोलिसांवर हल्ला केल्याच्या घटनाही यापूर्वी उघडकीस आल्या आहेत. तर बुधवार पेठेत एका सराईत गुंडाने एका पोलीस हवालदाराचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली. त्यानंतर पुन्हा एकदा एका सराईत गुंडांच्या अंत्ययात्रेसाठी अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
हेही वाचा - काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे पुण्यातील जहांगीर रुग्णालयात निधन