पुणे - महाराष्ट्र सरकारने दारूची दुकाने उघडली, तर मंदिरे उघडायला काय अडचण?...दार उघडा दार उघडा, देवाचे दार उघडा... मंदिरे बंद ठेवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो... अशा घोषणा देत भंडारा उधळून सारसबाग येथील खंडोबा मंदिराचा दरवाजा उघडण्यात आला. पुण्यातीलच नव्हे, तर महाराष्ट्रातील मंदिरे उघडण्यात यावी, याकरता कार्यकर्त्यांनी खंडोबाची आरती देखील केली.
श्री स्वामी ओम मल्हारी प्रतिष्ठान व पतित पावन संघटनेतर्फे सारसबाग येथील खंडोबा मंदिर येथे मंदिरे नागरिकांसाठी खुली करावी, यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी स्वप्निल नाईक, गौरव घोडे, आशिष पालकर, सचिन कचरे, अविनाश पवार, पदम तिकोने, ॠतिक वाघमारे, आकाश महागडे यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून हे आंदोलन व मंदिर उघडून आरती देखील करण्यात आली.
![patit pavan sanghatana agitation for opneing temple in pune](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pun-02-patitpavan-manidrsuru-andolan-avb-mh10021_13092020160615_1309f_1599993375_977.jpg)
यावेळी गौरव घोडे म्हणाले, की नागरिकांचे नैराश्य दूर होऊन सद्यपरिस्थिती पूर्ववत होण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सर्व मंदिरे त्वरीत खुली करावी. मंदिरे उघडली तर हळद कुंकू, फुले, नारळ व प्रसाद विक्री करणाऱ्यांच्या पोटाचा प्रश्न मार्गी लागेल. कोरोनाच्या काळात या लोकांचे मोठे नुकसान झाले असून महाराष्ट्र सरकारने त्यांनी आर्थिक मदतही करावी, असेही त्यांनी सांगितले.
![patit pavan sanghatana agitation for opneing temple in pune](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pun-02-patitpavan-manidrsuru-andolan-avb-mh10021_13092020160615_1309f_1599993375_606.jpg)