पुणे - राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. राज्य सरकारला न्यायालयात बाजू मांडता आली नाही. ओबीसींच्या न्याय हक्कासाठी आम्ही पुर्ण ताकदीने येत्या २६ तारखेला रस्त्यावर उतरणार असून, संपुर्ण देश बघेल असे आंदोलन करू असा इशारा भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी दिला आहे. त्या पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होत्या.
पंकजा मुंडे पुढे बोलताना म्हणाल्या की, ओबीसी आरक्षणावरून आता राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवत आहे. मात्र, इम्पेरियल डाटाच्या आधारे राज्य सरकार हे करू शकते. त्यासाठी केंद्राची गरज नाही. आरक्षण गेल्यानंतर आता सत्तेतील ओबीसी मंत्री मोर्चे काढत असून, मंत्र्याकडे अधिकार आहेत त्याचा वापर त्यांनी करावा. मोर्चे काढण्याची गरज काय आहे? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. भाजपा ओबीसींसाठी रस्त्यावर उतरणार असून, २६ तारखेला आंदोलन करण्या येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
वडेट्टीवारांच्या बैठकीला उपस्थित राहणार - मुंडे
ओबीसी आरक्षणाबाबत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांची बैठक बोलाविली असून, याबाबत मुंडे यांना विचारले असता, या बैठकीला मला देखील बोलवण्यात आले आहे. ओबीसींच्या प्रश्नांसाठी मी कुठेही जायला तयार आहे. त्यामुळे मी या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचेही पंकजा मुंडे यांनी सांगितले.