पुणे - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुण्याला ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवला. ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने, मागणीमध्ये प्रचंड वाढ झाली होती. याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने आता ऑक्सिजन जनरेटिंग प्लांटची निर्मिती केली आहे. या प्लांटच्या माध्यमातून शहराला ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे.
दिवसाला 30 टन ऑक्सिजनची निर्मिती
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली, तरी देखील गंभीर कोरोनाबाधितांची संख्या अद्यापही घटलेली नाही. अनेक रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे. म्हणूनच पुणे महापालिकेने आता ऑक्सिजन निर्मितीवर भर दिला आहे. पुणे महापालिका 12 ऑक्सिजन प्लांटच्या माध्यमातून दिवसाला 30 टन ऑक्सिजनची निर्मिती करणार आहे.
महापालिकेच्या ८ रुग्णालयात १२ प्लांट
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुण्यात रुग्ण वाढल्याने, मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत होती. ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी नियोजन करताना प्रशासनाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या पार्श्वभूमीवर आता महापालिकेने ऑक्सिजन जनरेटिंग प्लांट बसवण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या 8 रुग्णालयात एकूण 12 प्लांट बसवण्यात येणार आहेत.
जिल्ह्याला एकूण २०० ते २५० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज
पुणे जिल्ह्याला सद्यपरिस्थीतीत एकूण २०० ते २५० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे, पुण्याला सद्या नियमित ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. मात्र संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून महापालिकेने तयारी सुरू केली आहे.
हेही वाचा - आजही मोनोरेल बंद; ट्रॅकवर पडली झाडाची फांदी