पुणे - शहरातील औंध जिल्हा रुग्णालयात आज कोविडची ड्राय रन पार पडली. जिल्ह्यातील माण आणि चिंचवड येथील रुग्णालयात देखील ही ड्राय रन पार पडली आहे. तिन्ही रुग्णालयात नोंदणीकृत 75 आरोग्य कर्मचाऱ्यांवर टेस्ट करण्यात आली. अद्याप कोणत्याही व्यक्तीला कोविडची लस देण्यात आली नसल्याची माहिती डॉ.नितीन बिलोलीकर यांनी दिली आहे.
राज्यातील चार जिल्ह्यात कोविड ड्राय रन घेण्यात आले. त्यात, पुण्यातील औंध जिल्हा रुग्णालय, पिंपरी-चिंचवड शहरातील जिजामाता रुग्णालय आणि मुळशी तालुक्यातील माण येथील ग्रामीण रुग्णालयात आज सकाळी नऊ ते अकराच्या दरम्यान ही ड्राय रन पार पडली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कोविड लस 'ड्राय रन'चा आढावा
मुळशी तालुक्यातील माण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण मोहिमेला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी भेट देऊन पाहाणी केली. तसेच कोरोना लसीकरणाची पूर्वतयारी म्हणून ड्राय-रन (रंगीत तालीम) ही घेण्यात आली. पुणे जिल्ह्यामध्ये कोरोनाचे आतापर्यंत ३ लाख ६२ हजार ९७९ एवढे बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
कोविड १९ चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी भारतात लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यानुसार कोविड-१९ लसीकरणाचे टप्पे आखण्यात आले आहेत.
पहिला टप्पा : सर्व शासकीय व खाजगी आरोग्य संस्था अंतर्गत सर्व कर्मचारी
दुसरा टप्पा : वयोवृद्ध व कोमॉर्बिडीटी असणारे
तिसरा टप्पा: इतर सर्व सामान्य नागरिक
याची पूर्वतयारी म्हणून ड्राय-रन (रंगीत तालीम) 2 जानेवारी शनिवार पुणे जिल्ह्यातील ३ आरोग्य संस्थांमध्ये घेतली गेली. यामध्ये लस उपलब्ध झाल्यानंतर घेण्यात येणाऱ्या लसीकरण सत्राची हुबेहुब ड्राय-रन (रंगीत तालीम ) करण्यात आली.
यावेळी कोणालाही लस देण्यात आली नाही, या ड्राय रन (रंगीत तालीम) साठी पुणे जिल्ह्यात तीन ठिकाणे निवडण्यात आली होती. यात पुणे ग्रामीणमधील माण येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, औंध येथील पुणे जिल्हा रुग्णालय आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचे जिजामाता आरोग्य केंद्र यांचा समावेश होता. प्रत्येक ठिकाणी 25 लाभार्थी होते.
लसीकरण सत्राच्या ठिकाणी ३ खोल्या तयार करण्यात आलेल्या होत्या. या वेळी सामाजिक अंतर, मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्यात आला.