पुणे - सध्या महाराष्ट्रात काही भागांमध्ये बर्ड फ्लूने थैमान घातले आहे. त्यामुळे नागरिकही पशु-पक्षांना खाद्य देण्यासाठी घाबरत आहेत. या रोगाची लागण होईल, या भीतीने ते लांबच राहणे पसंत करत आहेत. काही नागरिकांनी भीतीने चिकन खाणे सोडून दिले आहे. या रोगराईच्या काळातदेखील पक्ष्यांची काळजी घेणारा अवलिया देहूरोड परिसरात पाहायला मिळत आहे. कैलाश ठाकूर असे या अवलियाचे नाव असून दररोज न चुकता पक्षांना खाद्य टाकत आहे. त्यांच्या येण्याने त्या परिसरात वेगळेच प्रसन्न वातावरण निर्माण होत आहे.
बर्ड फ्ल्यूविषयी जागरूकता, भीती नाही
पिंपरी-चिंचवड शहरातील देहूरोडमध्ये कैलाश ठाकूर नावाचे अवलिया हे कावळे, साळुंखी, कबुतरांना दररोज न चुकता खाद्य टाकतात. एकीकडे महाराष्ट्रात काही भागात 'बर्ड फ्ल्यू'ने थैमान घातले असून पक्षांना जे नागरिक खाद्य टाकत होते. त्यांच्या मनातदेखील बर्ड फ्ल्यूविषयी भीती निर्माण झाली आहे. अश्याच पक्षीप्रेमीने कावळ्याला नियमितपणे खाद्य टाकत असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या मनात बर्ड फ्ल्यूविषयी जागरूकता आहे, मात्र भीती नाही, असे त्यांनी सांगितले आहे.
ते येताच कावळे जमा होतात अन्...
सूर्यास्त होताच देहूरोड रेल्वे स्थानाकाच्या परिसरात पक्षी प्रेमी ठाकूर येताच पक्ष्यांची किलबिल सुरू होते. भुकेने व्याकुळ असलेले कावळे गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सगळ्या पक्षांना त्यांची सवय झाली आहे. नियमितपणे हे सर्व पक्षी सायंकाळी 6 ते 6:30च्या दरम्यान अन्नदाता ठाकूर येताच मोकळ्या जागेत जमून आपली पोटपूजा करतात. अनेक जण सध्या पक्षांच्या जवळ जाणे टाळतात किंवा खाद्य ही देत नाही. परंतु, रोज न चुकता पक्षांना खाद्य देणाऱ्या या अवलियाचे परिसरात कौतुक होताना दिसत आहे.