पुणे - भोसरी येथील इंद्रायणी नगरमधील विद्युत रोहित्राचा भीषण स्फोट झाला. या घटनेत गंभीर भाजल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. तर माय-लेकी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमीत पाच महिन्यांच्या चिमुकलीचा समावेश आहे. स्फोटांमध्ये शारदा दिलीप कोतवाल (वय- 51) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, हर्षदा सचिन काकडे (वय- 32) आणि शिवानी सचिन काकडे (वय- 5महिने) या दोघी गंभीर भाजल्या आहेत. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या स्फोटात रोहित्रातील तेल शारदा कोतवाल, नात शिवानी आणि हर्षदा यांच्या अंगावर पडले यात शारदा या गंभीर भाजल्या. तर पाच महिन्याची चिमुकली आणि तिच्या आई जखमी झाल्या. त्यानंतर तत्काळ त्यांना उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच शारदा यांचा मृत्यू झाला. या स्फोटाची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन स्फोटामुळे रोहित्राला लागलेली आग विझवली, अशी माहिती भोसरी एमआयडीसी पोलिसांनी दिली आहे.