पुणे - राज्यामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात आढळला. यानंतर पुण्यात कोरोनाची परिस्थिती ही आणखीनच बिकट होत गेल्याने प्रशासनावर ताण वाढत गेला. तर सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक पन्नास हजार रुग्णांची वाढ झाली. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पुण्यातली परिस्थिती हाताबाहेर जातेय की काय अशी भीती होती, कारण अनेक रुग्णालयामध्ये बेड्स मिळत नव्हते. त्यामुळे काही रुग्णांचा जीव गेला. मात्र ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून पुणे शहरात कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत घट होताना पाहायला मिळते. सध्या पुणे शहरात साडेपंधरा हजार बेड्स पैकी 9 हजाराहून अधिक बेड रिकामे असल्याची माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी दिली आहे.
पुण्यात कोरोना आटोक्यात येत असल्याचे चित्र असले तरी, डिसेंबर, जानेवारीत कोरोनाची आकडेवारी वाढण्याची शक्यता असल्याचे केंद्रीय पथकाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे वर्षाअखेर आणि नव्या वर्षाची सुरवात पुणेकरांसाठी काळजीची राहणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे पथक नुकतेच पुण्यात आले होते. जम्बोसह बाधित क्षेत्राची पाहणी त्यांनी केली. कोरोनाची सद्यस्थिती, त्याचे परिणाम आणि वाढीची चिन्हे या अनुषंगाने महापालिकेला काही सूचना ही केल्या आहेत. पुढील दीड महिना, म्हणजे नोव्हेंबर अखेरपर्यंत रुग्णसंख्या आणखी कमी होईल, असे पथकातील तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले. परंतु, डिसेंबर आणि जानेवारीत मात्र, संसर्गाचा वेग वाढण्याची शक्यता ही वर्तवली
आहे.