पुणे / सातारा - व्यावसायिकाचे अपहरण करून त्याला मारहाण केल्याच्या गुन्ह्यात फरारी असलेल्या पुण्यातील कुख्यात गुंड गज्या मारणेला पुणे पोलिसांनी साताऱ्यातील वाई येथी फार्म हाऊसमधून ताब्यात घेतले आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली.
अपहरणाच्या गुन्ह्यात होता फरारी - शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतविलेल्या ४ कोटी रुपयांच्या बदल्यात २० कोटींची खंडणी मागून व्यावसायिकाचे अपहरण करत मारहाण केल्याचा आरोप गज्या मारणेवर आहे. याप्रकरणी आठ दिवसांहून अधिक काळ तो पोलिसांना गुंगारा देत होता. पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने वाई (जि. सातारा) येथील फार्म हाऊसमधून त्याला ताब्यात घेतले.
चार दिवस पोलीस कोठडी - व्यावसायिकाच्या अपहरण आणि मारहाण प्रकरणी अटक केल्यानंतर गज्या मारणेला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला दि. २० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, गज्यासह १४ जणांवर नुकतीच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये त्याच्या टोळीत सहभागी असणाऱ्या साताऱ्यातील तिघांचा समावेश आहे.
१४ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई - पुणे पोलिसांनी गजा मारणे टोळीवर नुकतीच मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. त्यामध्ये गजानन ऊर्फ गज्या ऊर्फ महाराज पंढरीनाथ मारणे (रा. शास्त्रीनगर, कोथरूड), सचिन ऊर्फ पप्पू दत्तात्रय घोलप (रा. धनकवडी), हेमंत ऊर्फ आण्णा बालाजी पाटील (रा. बुरली, ता. पलूस, जि. सांगली), अमर शिवाजी किर्दत (रा. कोडोली, जि. सातारा), फिरोज महंमद शेख (रा. समर्थनगर, कोडोली, जि. सातारा), नितीन पगारे (रा. सातारा), रूपेश कृष्णराव मारणे (रा. कोथरूड), संतोष शेलार (रा. कोथरूड), मोनिका अशोक पवार (रा. दापोडी, पुणे), अजय गोळे (रा. नर्हे, पुणे), प्रसाद खंडागळे (रा. तळजाई पठार, सहकारनगर), डॉ. प्रकाश बांदिवडेकर (रा. चंदगड, जि. कोल्हापूर) आणि नवघने यांचा समावेश आहे.
बलात्काराची धमकी देत मारहाण - सिंहगड परिसरात राहणारे फिर्यादीचा जमीन खरेदी-विक्री व शेअर ट्रेडींगचा व्यवसाय आहे. त्याच माध्यमातून त्यांची हेमंत पाटील याच्याशी ओळख झाली होती. पाटील याने व्यावसायिकाकडे ४ कोटी रुपये शेअर्समध्ये गुंतवणुकीसाठी दिले होते. त्यावरुन त्यांच्यात वाद झाले होते. हेमंत पाटील हा सराईत गुन्हेगार असून हेमंतसह सचिन घोलप, अमोल किर्दत व अन्य संशयितांनी दि. ७ ऑक्टोबर रोजी फिर्यादी व त्यांच्या एका मित्राचे कात्रजमधून अपहरण केले. रात्रभर रावेत, वाकड परिसरामध्ये फिरविले. तेथे पाटील याने त्यांच्याकडे 20 कोटी रुपयांची मागणी केली. त्यानंतर रात्रभर वेगवेगळया गाडीमधून फिरवून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत मारहाण केली होती. या संदर्भातील गुन्हा दाखल झाल्यापासून गज्या मारणे फरार होता.
वाईतील फार्म हाऊसवर पोलिसांचा छापा - गजा मारणे सातार्यातील वाई परिसरात लपून बसला असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक बालाजी पांढरे यांना मिळाली. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने गज्याला वाईतील फार्म हाऊस मधून ताब्यात घेतले. वरिष्ठ निरीक्षक बालाजी पांढरे, सहायक निरीक्षक चांगदेव सजगणे, उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, मोहनदास जाधव, विजय गुरव, प्रदीप शितोळे, शैलेश सुर्वे, राहुल उत्तरकर, सचिन अहिवळे, अमोल पिलाने यांच्या पथकाने ही कारवाई केली.
रेकी करणाराही गजाआडग - रेकी करणारा आणि अपहृत फिर्यादीची इत्यंभूत माहिती गज्या मारणेच्या टोळीला पोहचविणारा प्रसाद बापू खंडाळे (रा. तळजाई वसाहत) हा दांडेकर पूल येथे लपून बसला होता. त्याला गुन्हे शाखेचे सहायक पोलीस उपायुक्त नारायण शिरगावर यांच्या पथकातील सुधीर इंगळे, नितीन शिंदे, भाऊसाहेब रोडमिसे यांनी सापळा रचून अटक केली.