पुणे - 'नो हाँकीग डे' अर्थात एक दिवस हॉर्नला पूर्ण विश्रांती अशी संकल्पना शहरात राबविण्यासाठी जनजागृती करण्यात आली. लाईफ सेव्हिंग फाऊंडेशन, नवचैतन्य हास्ययोग परिवार आणि पुणे पोलीस (वाहतूक विभाग) यांच्यावतीने टिळक चौक (अलका टॉकीज चौक) येथे 'नो हॉर्न डे' हा जनजागृतीपर कार्यक्रम करण्यात आला.
पुणे पोलीस वाहतूक विभाग उपायुक्त राहुल श्रीरामे म्हणाले, की पुण्यात लोकसंख्येपेक्षा जास्त वाहनांची संख्या आहे. साधारणत: दररोज एक कोटीपेक्षा जास्त वेळा हॉर्न वाजवला जातो. यातील ९० टक्के हॉर्न हे अनावश्यक असतात. बहुतांशी पुणेकरांना या अनावश्यक हॉर्नमुळे अनेक दुष्परिणामांना सामारे जावे लागते. त्यामुळे अनावश्यक हॉर्न वाजवू नका, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
ऐका हो ऐका हॉर्न वाजवू नका...नका वाजवू हॉर्न तब्येत राहिल छान... अशा घोषणा देत पुणेकरांनी 'नो हाँकीग डे' अर्थात 'नो हॉर्न डे' राबविला.
नो हॉर्न संकल्पना प्रत्यक्षात उतरविणे गरजेचे
वाढत्या ध्वनिप्रदूषणात हॉर्नचा आवाज प्रमुख कारण आहे. त्याचप्रमाणे पुणेकरांना उच्च रक्तदाब, हदयरोग, मानसिक ताण, चिडचिडेपणा, नैराश्य आणि बहिरेपणा या त्रासांचादेखील सामना करावा लागत आहे. हे टाळण्यासाठी नो हॉर्न संकल्पना प्रत्यक्षात उतरविणे गरजेचे असल्याचे लाईफ सेव्हिंग फाऊंडेशनचे देवेंद्र पाठक म्हणाले.