पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी दिवसभरात 31 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून यात 6 शहरा बाहेरील रुग्णांचा समावेश आहे. तर एकाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू हा कोरोना विषाणूमुळे झालेला आहे. तर शहरातील बाधितांचा एकूण आकडा हा 584 वर पोहचला आहे. पैकी 319 शहरातील तर 37 बाहेरील व्यक्तींना कोरोनामुक्त करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना बाधितांचा आकडा वाढत असून 600 च्या दिशेने वाटचाल करत आहे.
आजदेखील दिवसभरात 31 जण कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. यातील 6 जण हे कसबा पेठ, आंबेगाव, बालेवाडी, औंध, खडकी आणि देहूरोड येथील रहिवासी आहेत. तर शहरातील मोरवाडी, रामनगर, अजंठानगर, सांगवी, पिंपरी, पिंपळे गुरव, चिंचवड, आनंदनगर, वाकड, दापोडी, किवळे आणि पिंपळे सौदागर येथील रहिवासी आहेत. मृत्यू झालेला 70 वर्षीय व्यक्ती हा देहूरोड परिसरातील आहे. शहरातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 10 वर पोहचली आहे. तर शहराबाहेरील रूग्णांच्या मृत्यूचा आकडा 15 झाला आहे.
पावसाळा सुरू झाल्यामुळे अतिरिक्त मास्क बाळगा, वैद्यकीय तसेच पावसाचे पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही, याची काळजी घ्या. तसेच सोबत किमान 1 तरी अतिरिक्त मास्क ठेवा, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये, असे आवाहन पिंपरी चिंचवड मनपामार्फत सर्व नागरिकांना करण्यात आले आहे.