पुणे - जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी खेकड्यांमुळे तिवरे धरण फुटल्याचा अजब दावा केला होता. त्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी सावंत यांच्या घरासमोर खेकडे सोडून आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी धरणफुटी प्रकरणी खेकड्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन खेकड्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणीही केली.
तिवरे धरण फोडल्यानंतर हे खेकडे मंत्र्यांचे घर देखील फोडू लागले आहेत. त्यामुळे तातडीने या खेकड्यांवर ३०२चा गुन्हा दाखल करावा. अन्यथा उद्या अजून काही दुर्घटना घडू शकेल, असा टोला कार्यकर्त्यांनी लगावला. खेकड्यांच्या घर पोखरण्यामुळे सावंत आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या जीवाला धोका होता पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळेच आज त्यांचे जीव वाचले, असे म्हणत या कार्यकर्त्यांनी सावंत यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या निवासस्थानी खेकड्यांनी धुमाकूळ घातला आणि त्यांचे निवासस्थान फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ही माहिती मिळताच जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या घरी धाव घेतली. यावेळी कार्यकर्त्यांनी या खेकड्यांना पकडून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील निरीक्षकाच्या ताब्यात दिले, अशी माहिती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिली.