पुणे - सरकारवर पवार नाराज आहेत असे विरोधक बोलतात, तसे काहीही नाही. राज्यातील समस्यांवर विचार करतो तसेच चर्चेसाठी मातोश्रीवर गेल्याने कमीपणा वाटत नाही, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधकांच्या टिकेला उत्तर दिले आहे. शरद पवारांना या वयात मातोश्रीवर चकरा माराव्या लागतात हे बरोबर नाही, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्याला शरद पवारांनी उत्तर दिले. तसेच चंद्रकांत पाटील यांना चिंता वाटत असेल, मात्र मला मातोश्रीवर जाण्यात कमीपणा वाटत नाही, असे पवार म्हणाले. ते पुण्यात बोलत होते.
हेही वाचा - फास्ट टेस्टिंगसाठी पुण्यातील माय लॅबने तयार केले मशीन; 'ऑक्सफर्डची लस यायला लागणार 6 महिने'
मंगळवारी पुण्यात व्यापारी महासंघाने शरद पवार यांच्यासोबत बैठक घेत त्यांच्या समस्या पवारांसमोर मांडल्या. या बैठकींनंतर पवार पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पवारांनी कोरोना परिस्थिती, राज्यासमोरील अडचणी, विरोधकांची टीका, पंतप्रधानांचा सीमा दौरा अशा विविध विषयांवर आपली मते मांडली.
मुख्यमंत्री बाहेर पडत नाही अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे. त्यावर बोलताना, महत्वाच्या नेत्यांनी बाहेर पडले की लोकंं जमतात म्हणून ते टाळले जाते, असे सांगत पवारांनी मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली. तसेच शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेल्या नगरसेवक विषयावर बोलताना, पारनेर हा फार लहान प्रश्न आहे असे पवार म्हणाले.
यापूर्वी ही युद्धानंतर नेहरू, यशवंतराव चव्हाण सीमेवर गेले होते. त्यामुळे अशा काळात पंतप्रधानांनी सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी जाणे गरजेच आहे, असे शरद पवार यांनी पंतप्रधानांच्या सीमा दौऱ्याबाबत बोलताना सांगितले.
कोरोना महामारीचा परिणाम आयुष्यावर झाला आहे. याची जबरदस्त किंमत मोजावी लागली असून महाराष्ट्र, दिल्लीसह इतर राज्यांना याचा फटका बसला आहे, असे पवार म्हणाले. सध्या व्यापार हा शहरात केंद्रित असून, तो विकेंद्रित करण्याचा विचार आहे. पुणे परिसरात सरकारने मोठी जमीन उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी आहे. कोरोनामुळे वेगवेगळ्या क्षेत्रांवर परिणाम झाल्याचेही शरद पवार यांनी सांगितले.