पुणे - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अनेक जण बाहेर पडत असून त्याचे अप्रत्यक्ष समर्थन खासदार अमोल कोल्हे यांनी केले आहे. राष्ट्रवादीतील 'आऊट गोईंग' हे 'परिवर्तन' आहे, असे कोल्हे म्हणाले. ते पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
आम्ही शिवस्वराज्य यात्रा ही रयतेच्या राज्यासाठी काढत आहोत, खुर्चीसाठी नाही. काही जण यात्रेद्वारे मीच मुख्यमंत्री पदाचा दावेदार असल्याचे म्हणत आहेत, तर काही जण यात्रेतून यांनाच मुख्यमंत्री करायचा असा सूर काढत आहेत. मात्र, या स्पर्धेत स्वतः नसल्याचे कोल्हे यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीतील आऊट गोईंगवर बोलताना ते म्हणाले, मी आऊट गोईंगला परिवर्तन असे म्हणतो. पक्षाला एक क्षण असा येतो की नेतृत्व खांदेपालट होण्याची वेळ असते. या घटनांमुळे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता जिद्दीने पेटून उठला आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये ते दिसून येईल. त्याचे वेगळे चित्र असेल, असेही ते म्हणाले.
शिवस्वराज्य यात्रा महाराजांचा सर्वसामान्य मावळा काढतो आहे. जो या स्पर्धेत कुठेही नाही. मला खुर्ची हवी, म्हणून मी यात्रा काढत नाही. रयतेचे राज्य यावे, यासाठी ही यात्रा काढत असल्याचे ते म्हणाले.