पुणे : पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सर्वधर्मीय हनुमान जयंती व रोजा इफ्तार कार्यक्रमाचं एकत्रित आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात हिंदू आणि मुस्लिम समाज एकत्र येत आधी हनुमान जयंती निम्मित आरती करण्यात आली. तर नंतर मुस्लिम बांधवांनी मंदिरातच आपला रोजा सोडला.
मान्यवरांची उपस्थिती : या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, तसेच राज्याचे जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची उपस्थिती होती.
आधी नमाज पठण करत तर नंतर हनुमान चालीसा म्हणत सोडला रोजा : राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या या इफ्तार पार्टीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुस्लिम बांधवांना घास भरवत त्यांचा उपवास सोडवला. तर उपवास सोडण्याच्या आधी मंदिरातच नमाज पठण केलं अणि लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी हनुमान चालीसेचं पठण देखील केलं. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात हिंदू आणि मुस्लिम समाज एकत्रित जमला होता. त्याचबरोबर वारकरी संप्रदायाचे अनेक वारकरी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
भारत हा सर्वधर्म समभाव देश - अजित पवार : यावेळी बोलताना अजित पवार यांनी भारत हा सर्वधर्म समभाव देश असून, हजारो वर्षापासून लोक एकोप्याने नांदतात. मात्र आता कुणीही राजकारण करून देशाचा एकोपा मोडण्याचा प्रयत्न करु नये, असा दम देत आपला देश बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानावर चालणारा देश आहे याची आठवणदेखील त्यांनी करून दिली. त्याचबरोबर जातीजातीतील गरीब लोक भरडले जातात. श्रीमंतांना काहीच अडचण होत नाही, असं ठाम मत त्यांनी मांडलं. तसेच अलीकडच्या काळात सोशल मिडीयाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने चुकीची माहिती त्यावर पसरवून तरुणांना चुकीची माहिती दिली जाते. अशी प्रवृत्ती कोणाची असेल तर त्याला कडक कायदा करुन शासन झालं पाहिजे, असं स्पष्ट मत अजित पवार यांनी मांडलं.
पुण्यात राज ठाकरेंच्या हस्ते हनुमान चालीसा पठण : एकीकडे पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वधर्मीय हनुमान जयंती व रोजा इफ्तार कार्यक्रमाचं आयोजन केलं होत. तर दुसरीकडे आज हनुमान जयंतीच औचित्य साधून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते हनुमानाची आरती करत सामूहिक हनुमान चालीसा पठण करण्यात आलं. यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आरती करत हनुमान चालीसेच पठण केलं.