पुणे - पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी झालेल्या गर्दीवरून सर्व बाजूंनी टीका होऊ लागल्यानंतर अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पुणेकरांची जाहीर दिलगिरी व्यक्त केली. 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिस्त पाळणारा पक्ष आहे. परंतु अनेक वर्षानंतर पुणे शहरात पक्षाचे कार्यालय स्थापन करण्यात आले. त्यामुळे अजित पवार आणि पक्षावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. ही गर्दी रोखण्यासाठी आम्ही कमी पडलो' अशी प्रतिक्रिया प्रशांत जगताप यांनी दिली.
हेही वाचा - मराठमोळ्या स्मृती मानधनाच्या फोटोंवर नेटकरी घायाळ, सोशल मीडियावर केवळ स्मृतीचीच चर्चा
काय आहे प्रकरण -
शनिवारी सायंकाळी शिवाजीनगर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लग्नासाठी 50, अंत्यसंस्कारासाठी 20, सार्वजनिक कार्यक्रमासाठी शासन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने परवानगी असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या या कार्यक्रमात मात्र मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या कार्यक्रमात 400 ते 500 कार्यकर्ते सहभागी झाले होते. यातील अनेकांनी मास घातले नव्हते, त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने कोरोना नियमांचे उल्लंघन होऊनही कारवाई का नाही, असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात होता. त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही गर्दी पाहून स्वतः अजित पवारांनी पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत प्रशांत जगताप यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांना अटकही केली होती. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटकाही करण्यात आली.
हेही वाचा - पृथ्वीराज चव्हाण विधानसभेचे नवे अध्यक्ष?