पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Leader Raj Thackeray ) यांनी गुढीपाडव्याला दादर येथील शिवाजी पार्कवरील सभेत मशिदीवरील भोंगे उतरवण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर राज्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यात आता राज ठाकरेंच्या वक्तव्याविरोधात पुण्यात मुस्लिम समाज आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी जमलेल्या मुस्लिम कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.
या आंदोलनामध्ये मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता. यावेळी आंदोलनकर्त्यांनी राज ठाकरेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यापुढे पुण्यात एकही मुस्लिम मनसेला मतदान करणार नाही. राज ठाकरे हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत, असा आरोप देखील आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
राज ठाकरे काय म्हणाले होते? - शिवाजी पार्कवरती बोलताना राज ठाकरे म्हणाले होते की, मशिदीवरील भोंगे खाली उतरवावेच लागेल. माझा प्रार्थनेला विरोध नाही. ज्या मशिदीच्या बाहेर भोंगे लागतील त्याच्यासमोर भोंग्यांच्या दुप्पट स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा. मी धर्मांध नाही. धर्माभिमानी आहे. माझा कुणाच्या प्रार्थनेला विरोध नाही. पण आम्हाला त्रास देऊ नका, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. आम्हाला लाऊडस्पीकरचा त्रास होतो. धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का? बाहेरच्या देशात बघा. युरोपात जा. तिथे मशीदीवर लाऊडस्पीकर नाही. तुम्हाला प्रार्थना करायची तर घरात करा, असे युरोपातील शासन आहे, असेही राज ठाकरे यांनी सांगितले होते.
हेही वाचा - ST Worker Agitation : सिल्व्हर ओकवर पोहोचलेल्या कर्मचाऱ्यांसमोर सुप्रिया सुळेंनी जोडले हात, म्हणाल्या...