पुणे - दिवाळी म्हटलं की फटाके आलेच..दरवर्षी पर्यावरण आणि प्रदूषणाच्या दृष्टीने दिवाळीत फटाके फोडू नये असे आवाहन करण्यात येत असते. मात्र, तरी देखील नागरिक मोठ्या प्रमाणात फटाके फोडतात. एकीकडे पर्यावरणासाठी जनजागृती केली जात आहे, तर दुसरीकडे मात्र फटाके काही कमी होताना दिसून येत नाहीत. हीच बाब लक्षात घेता पुण्यातील 85 वर्ष जुनी असलेल्या 'मूर्तीज बेकरी'च्यावतीने गेल्या 5 वर्षांपासून फटाक्यांचे चॉकलेट विकले जात आहेत. बच्चे कंपनीने दिवाळीत फटाके न फोडता या अनोख्या फटाक्यांसह पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी, या उद्देशाने मूर्तीज बेकरीच्यावतीने चॉकलेटचे फटाके तयार केले जात आहेत.
- चॉकलेटच्या फटाक्यांना मोठ्या प्रमाणात मागणी-
सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची दुकाने सजली आहेत. फटाक्यांपासून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असते. फटाक्याने अनेक दुर्घटना घडल्या देखील आहेत. फटाक्यांवर बंदी आणून देखील फटाके फोडून पर्यावरण दूषित करण्याचे काम केले जातं आहे. पण असे असले तरी फटाके फोडणाऱ्या बच्चे कंपनीला आकर्षित करण्यासाठी बाजारात चॉकलेटचे फटाके आले आहेत. या चॉकलेटच्या फटाक्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असून नागरिकांकडून गिफ्ट देण्यासाठी देखील याचा वापर केला जात आहे.
मुलांना फटाके आणि चॉकलेट आवडीचे असल्याने 'फटाका चॉकलेट' ही संकल्पना बाजारात आली आहे. पुण्यातील 'मूर्तीज बेकरी'च्या माध्यमातून गेल्या पाच वर्षापासून फटाक्यांचे चॉकलेट्स बाजारात विकले जात आहेत. त्याला मागणी देखील मोठ्या प्रमाणात आहे. या चॉकलेट्स फटाक्यांमध्ये रॉकेट, भुईचक्र, लक्ष्मी बॉम्ब, बॉम्ब अशा विविध फटाक्यांचे प्रकार आहेत. तसेच विशेष म्हणजे मूर्तीस बेकरीच्यावतीने चॉकलेटचा किल्लादेखील बनवण्यात आलेला आहे. एकूणच पर्यावरणाचे रक्षण व्हावे यासाठी गेल्या पाच वर्षापासून चॉकलेटचे फटाके तयार करत आहोत. त्याच पद्धतीने सध्या प्लास्टर ऑफ पॅरिसचे किल्ले देखील उपलब्ध झाल्याने दिवाळीनंतर त्या किल्ल्यांची व्यवस्थित विल्हेवाट लावली जात नाही. म्हणून यंदा मी चॉकलेटचा किल्लादेखील बनवला आहे, अशी माहिती यावेळी मूर्तीस बेकरीचे संचालक विक्रम मूर्ती याने दिली.
- काय आहे फरक -
मागील अनेक वर्षापासून बाजारात असलेल्या फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण होत आहे. तसेच या फटाक्यांमुळे कानाचे पडदेदेखील फाटतात. तसेच हृदय रोगांचे प्रमाण देखील वाढते. आवाजाबरोबर प्रचंड वायू प्रदूषण वाढवणारे हे फटाके केवळ दिवाळीच नव्हे तर लग्नाची मिरवणूक, क्रिकेटच्या सामन्यातील विजय आणि धार्मिक व राजकीय मिरवणुका यात वाजवतात. फटाक्यांमुळे आगी लागून अपघातदेखील होतात. तसेच या फटाक्यांमुळे जुन्या इमारतींना तडे जाण्याची शक्यता असते. घराचे प्लास्टर सैल होते. विजेचे बल्ब जळतात किंवा पडतात. तसेच बहिरेपणा येण्याची शक्यता देखील आहे.
- पर्यावरणपूरक चॉकलेटचे फटाके -
सध्या चॉकलेटचे फटाके बाजारात आले आहेत. या चॉकलेट फटाक्यांमुळे कोणतेही प्रदूषण होत नाही. तसेच हे फटाके पर्यावरणपूरक आहेत. कोणताही दुष्परिणाम होत नाही. हे फटाके मुलांना आकर्षित करण्याबरोबरच उत्कृष्ट चवदार असून, ते खाऊही शकतात. पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात येते.
हेही वाचा - कोल्हापूरची पोरं 'लै भारी'; दीपावली साहित्य विक्रीच्या नफ्यातून सामाजिक उपक्रम