पुणे - अवकाळी पावसाचा फटका पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर व शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला असून जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसान झाले असून पशुधनाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आत्तापर्यंत उत्तर पुणे जिल्ह्यातील 700 पेक्षा अधिक मेंढ्यांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली असून अजूनही पंचनामे सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे. आग्नेय अरबी समुद्र व लगतच्या लक्ष्यद्वीप बेट समुह ते उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून राज्यातील ग्रामीण भागातही शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
700हून अधिक शेळ्या, मेंढ्यांचा गारठून मृत्यू -
पुणे जिल्ह्यात काल सकाळी मध्यम आणि तुरळक पाऊस झाला. पण दुपारनंतर पावसाचा जोर वाढत गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले. तर ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील आंबेगाव, खेड, दौंड, शिरूर, जुन्नर तालुक्यात शेतकऱ्यांना पिकांबरोबरच पशुधनही गमवावे लागले आहे. कालच्या पावसानंतर 700 हुन अधिक शेळ्या, मेंढ्यांचा गारठून मृत्यू झाला आहे. ही प्राथमिक माहिती असून पंचनामे सुरू आहे आणि उद्या पर्यंत सविस्तर माहिती घेऊन राज्य सरकारकडे तपशील देण्यात येईल, अशी माहितीदेखील यावेळी आयुष प्रसाद यांनी दिली.
तालुक्यात मोठ्या प्रमाणात पशुधनाचे नुकसान -
आंबेगाव तालुक्यात धोंडमाळ शिवारामध्ये पावसामुळे व गारवामुळे ३० ते ३५ मेंढरू मृत्युमुखी पडले आहेत. शिंगवे येथे (२० ते २५ ), खडकीयेथे (४० ते ४५) मेंढ्या रात्री पडलेल्या पावसामुळे मृत्युमुखी पडल्या आहेत. पिंपळगाव म्हाळुंगे येथील ३, कथापूर येथील ३२ मेंढ्या रात्री पडलेल्या पावसामुळे मृत्युमुखी पडल्या आहेत. जुन्नर तालुक्यामध्येदेखील अनेक ठिकाणी थंडीने व पावसाने गारठून मेंढ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्याबाबत पंचनामे सुरू आहे. शिरुर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथे ४० ते ४५ मेंढ्यांचा मृत्यू आहेत.
हेही वाचा - Omicron In India : भारतात ओमायक्रॉनचा शिरकाव, कर्नाटकमध्ये सापडले दोन रुग्ण