पुणे - राज्यासह पुण्यात उष्णतेचा पारा अधिकच वाढताना दिसत आहे. पुण्यात देखील तापमान हे ४० अंशांच्या वर जाताना पाहायला मिळत आहे. मागील काही दिवस तापमानाचा पारा खाली घसरला होता. मात्र, आता पुन्हा तापमानात मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यातच आता आणखी काही दिवस उष्णता अशीच राहून राज्यातील ( Heat waves Maharashtra ) काही भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
हेही वाचा - विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्ट्या रद्द, रविवारी देखील शाळा सुरू ठेवण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय
या भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता : राज्यातील काही भागांत उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे. देशभरातील उष्णतेच्या लाटेचा हा परिणाम असल्याचे सांगितले जात असून, राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात उष्णतेची लाट येणार असल्याची शक्यता तज्ज्ञ वर्तावत आहेत. आवश्यकता नसल्यास घराबाहेर न पडण्याचा आणि जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.
पुण्यातही तापमानात मोठी वाढ : पुणे शहर आणि परिसरात आज संध्याकाळनंतर ढगाळ वातावरणाची शक्यता वर्तवली असून, उकाडा मात्र कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. पुणे जिल्ह्यातील काही भागांत काल 40 अंशाच्या पुढे तापमान गेले होते. पुढील आठवडाभरात कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा - VIDEO : पाणीटंचाईच्या विरोधात पुण्यात राष्ट्रवादीचे घंटानाद आंदोलन