पुणे - हजारो अनाथ लेकरांची माय म्हणून परिचित असणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal Passed away) यांचे मंगळवारी (4 जानेवारी) ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ७४व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सर्वच स्तरातून त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या निधनानंतर सिंधुताई सपकाळ यांच्या असंख्य आठवणी (Memories of Sindhutai Sapkal) जागवल्या जात आहेत. त्यातलीच एक आठवण म्हणजे पद्मश्री पुरस्कार जाहीर (Padma Shri) झाल्यानंतर त्यांनी तो आपल्या लेकरांना अर्पण केला होता.
VIDEO पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा -
VIDEO : 'पद्मश्री पुरस्कार माझ्या लेकरांना, त्यांच्या भुकेला अर्पण'
- पुरस्कारासाठी मी कधीही काम केले नाही - सिंधुताई
वर्ष 2021 च्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दिला जाणारा पद्मश्री पुरस्कार अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांना देण्यात आला होता. समाजकार्यात भरीव कामगिरी केल्याबद्दल त्यांना हा मानाचा पुरस्कार केंद्र सरकारकडून देण्यात आला. "पद्मश्री पुरस्कारापर्यंत येऊन पोहोचेल हे कधी ध्यानीमनीही नव्हते. हा पुरस्कार मिळाल्यानंतर मी भांबावून गेले. पुरस्कारासाठी मी कधीही काम केले नाही. माझा पुरस्कार मी माझ्या लेकरांना, त्यांच्या भुकेला अर्पण करते" अशा शब्दांत त्यांनी पुरस्कारावर आपली प्रतिक्रिया दिली होती. आज सिंधुताई यांचे निधन झाले आहे. मात्र, त्यांच्या आठवणी सर्वांसमोर ताज्यात आहेत.
- 750हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार
सिंधुताई सपकाळ यांच्या भरीव समाजकार्यासाठी आजपर्यंत 750हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्यांना केंद्र सरकारचा मानाचा पद्मश्री पुरस्कारही मिळाला. हा पुरस्कार माझा एकटीचा नाही तर संस्थेतील सर्व मुलांचा असल्याची भावना त्यांनी यानंतर बोलून दाखवली होती. "कधीही शाळेत न गेलेल्या, गुरे राखणाऱ्या मला पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर मी एवढी मोठी कधी झाले हा प्रश्न मला पडला. त्यामुळे फुलांच्या पायघड्यांवरून चालताना काटे बोचले तर सहन करायला शिका. काट्यांना फक्त टोचणे माहीत असते, त्यांना वेदना कळत नसतात. त्यामुळे तुम्हीच तुमचे पाय बळकट करा म्हणजे काटे तुमचे स्वागत करतील. मी चालत गेले म्हणून मोठी झाले, तुम्हीही चालत राहा" अशी भावना सिंधुताई सपकाळ यांनी त्यावेळी व्यक्त केली होती.
- सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनप्रवासावर एक नजर -
सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 1947साली वर्धा जिल्ह्यातील नवरगाव या ठिकाणी झाला. त्यांचे वडील अभिमान साठे हे गायी-गुरे राखायचे. चौथीपर्यंतचे शिक्षण झालेले. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह झाला. घरी सासुरवास. कुटुंबात शैक्षणिक वातावरण नाही. त्यात पतीनेही घराबाहेर हाकलले. अशा परिस्थितीत त्यांनी माहेर गाठले. परंतु तेथेही निराशाच हाती आली. आईनेही घरात ठेवून घेण्यास नकार दिला. त्यानंतर सुरू झाला सिंधूताईचा प्रवास. रेल्वेत भीक मागून रेल्वे स्टेशनवर, स्मशानभूमीत राहायच्या. स्टेशनवर उघड्यावर राहणाऱ्यांना त्यांनी एकत्र केले. मिळालेल्या अन्नाचा घास त्यांच्यासोबत बसून खाल्ला. स्टेशनवर राहणाऱ्या याच लोकांनी त्यांना संरक्षण दिले. रेल्वे स्टेशनवर राहणाऱ्या या लोकांनाच घेऊन पुढे त्यांनी ममता बाल सदन संस्था स्थापन केली. हीच संस्था आज पुढे जाऊन नावारूपाला आली. शेकडो अनाथ मुलांना या संस्थेत आधार दिला जातो. या मुलांचे शिक्षण, भोजन, कपडे, त्यांची राहण्याची व्यवस्था सर्व संस्थेकडून केले जाते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ही मुले स्वतःच्या पायावर उभी राहतील, यासाठीही प्रयत्न केले जातात.