पुणे - शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे संकट वाढत असतानाच यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने युद्धपातळीवर उपाययोजना करण्यात येत आहेत. जास्तीत जास्त बेड तयार करण्यावर सध्या प्रशासनाचा भर आहे. खाजगी रुग्णालयाकडून ऑक्सीजन बेड, व्हेंटिलेटर बेड कसे मिळवता येतील या दृष्टीनेही प्रशासन काम करताना दिसून येत आहे. परंतु पुणे शहरातील खाजगी रुग्णालय सहकार्य करीत नसल्याचा आरोप महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे.
वेळेत ऑक्सिजन बेड उपलब्ध न झाल्यामुळे धायरीतील एका तरुणाला बुधवारी आपले प्राण गमवावे लागले. तर काही दिवसांपूर्वी पुण्यातीलच एका निवृत्त शास्त्रज्ञाला वेळेत व्हेंटिलेटर न मिळाल्यामुळे जीव गमवावा लागला होता. या दोन्ही घटनांमध्ये खाजगी रुग्णालयाकडून हलगर्जीपणा झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला होते. पण रुग्णाची गंभीर अवस्था पाहूनही खाजगी रुग्णालयाने त्यांना दाखल करून घेण्यास नकार दिला होता. परंतु या रुग्णालयांवर आरोग्य विभागातर्फे अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आली नाही.
मोहोळ म्हणाले, खाजगी रुग्णालयाकडून बेड उपलब्ध न होण्याच्या आणि बीला संदर्भातल्या अनेक तक्रारी सध्या आमच्याकडे आले आहेत. राज्य सरकारने खासगी रुग्णालयाचे 80 टक्के बेड ताब्यात घेण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. असे असतानाही या रुग्णालयांकडून सहकार्य मिळत नाही. यामुळेच चार उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक या खाजगी रुग्णालयांवर देखरेख ठेवण्यासाठी करण्यात आली आहे. बेडची उपलब्धता, अवास्तव बिलाची आकारणी आणि सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास या बाबींचा विचार करून अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
रुग्णाला वेळेवर उपचार न मिळाल्याचा ज्या काही घटना घडल्या त्या घटनांचा अहवाल हे अधिकारी एकत्र करत आहेत. या अधिकाऱ्यांकडून अहवाल आल्यानंतर हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई केली जाईल. याच अनुषंगाने काही रुग्णालयांना नोटीसही पाठवण्यात आली आहे. यापुढेही जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. असे मोहोळ यांनी सांगितले.
हेही वाचा - उपचारासाठी आंदोलन करणाऱ्या पुण्यातील 'त्या' कोरोनाबाधित रुग्णाचा अखेर मृत्यू..