पुणे - वाढत्या कोरोना रुग्णांमुळे शहरात पुन्हा टाळेबंदी लागणार की, काय? अशी परिस्थिती असताना पुण्यात कोणत्याही प्रकारची टाळेबंदी लागणार नाही. मात्र, अजून कडक निर्बंध लागण्याचे संकेत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले आहेत.
पुणे शहरात गेल्या महिन्याभरापासून मोठ्या प्रमाणात रुग्णांमध्ये वाढ होत आहे. जानेवारी महिन्यात पुणे शहरात फक्त 1500 सक्रीय रुग्णसंख्या होती. ती आजमितीला 7000 वर गेली आहे. पुणे शहरात कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी शहरात रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. तसेच शाळा महाविद्यालयेदेखील 14 तारखेपर्यंत बंद करण्यात आले आहे. असे असले तरी शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी येणाऱ्या काळात पुणे शहरात टाळेबंदी नव्हे तर अजून काही कडक निर्बंध लावण्यात येतील, असे संकेत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले. पुणे शहरातील कोरोनाबाबतची बैठक येत्या दोन दिवसात पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या बैठकीत शहरात काही निर्बंध लावण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
पुणे शहरात वाढत असलेल्या कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी येणाऱ्या काळात संध्याकाळच्या वेळेस शहरातील उद्याने बंद करणे, तसेच स्विमिंग पूल, तसेच मंगल कार्यालयाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. शहरात सध्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यावर आळा घालण्यासाठी पुढील काळात यावर अजून कडक निर्बंध लागण्याची शक्यता आहे.
शाळा-महाविद्यालये राहतील बंद
पुणे शहरात 14 मार्चपर्यंत शाळा महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, अजूनही शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, म्हणून शाळा महाविद्यालय देखील येणाऱ्या काळात बंदच राहणार आहे आणि त्याबाबत येत्या दोन दिवसात होणाऱ्या बैठकीत तसा निर्णय होऊ शकतो, असे यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले.