पुणे - सामान्य माणसांमध्ये रमजानविषयी अनेक गैरसमज आहेत. रमजान म्हणजे वेगवेगळे खाद्यपदार्थ खाण्याचा महिना आहे. देशोदेशीचे खाद्यपदार्थ, उच्चप्रकारच्या मिठाया बाजारात उपलब्ध होतात. मुसलमान रात्रभर त्या मिठाई अन्नपदार्थ खातात आणि दिवसभर उपाशी राहतात, असे अनेकांना वाटते. पण, असं नाही. रमजान म्हणजे काय ?का या महिन्यात उपवास म्हणजेच रोजा का करतात याबाबत मुस्लिम धर्मगुरू मौलाना शबी हसन काझमी यांनी माहिती दिली.
रमजान महिन्यात उपवास करतात - इस्लामिक कॅलेंडरनुसार नववा महिना रमजानचा असतो. रमजानला रमदानही म्हटले जाते. मुस्लिम समुदायात या महिन्याला सर्वात पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात एक महिना उपवास म्हणजेच रोजा करतात.आजपासून देशभरात सर्वत्र रमजान महिन्याला सुरुवात झाली आहे. रमजानमध्ये मुसलमान स्वतःच्या सामाजिक, धार्मिक, नैतिक स्थितीगतीचे पुनरावलोकन करतात. आत्मपरीक्षण करतात. त्यातील उणिवा, दोष दूर करतात. स्वतःमध्ये बदल घडवून आणतात. स्वतःमध्ये नैतिक सुधारणा घडवतात. मानवी जाणिवांच्या पातळीवर वर्षभराच्या संघर्षासाठी स्वतःला सिद्ध करतात. रमजान हा अल्लाहच्या आराधनेचा महिना आहे, असीह यावेळी मौलाना शबी हसन काझमी यांनी सांगितले.
इस्लामी उपासना संस्कृतीत 'रोजा, जकात, नमाज, तरावीह' यांचा समावेश होतो - रमजानमध्ये मुस्लिम समुदायात सूर्योदयाच्या पूर्वीपासून ते सूर्यास्त होईपर्यंत कडक उपवास करतात. स्वत:ला अल्लाहसमोर समर्पित करून त्याने दिलेल्या आदेशानुसार जगण्यासाठी मुस्लिम प्रयत्न करतात. मुस्लिम म्हणून असणारी सारी धार्मिक कर्तव्ये पार पाडतात. रमजानमध्ये साजरा करण्याच्या इस्लामी उपासना संस्कृतीत 'रोजा, जकात, नमाज, तरावीह' यांचा समावेश होतो. दिवसभर उपवास करुन संध्याकाळी परमेश्वर म्हणजेच अल्लाची इबादत करत असतात. या महिन्यात उपवासाला खूप महत्त्व असून प्रत्येक मुस्लिम धर्मीय म्हणजेच 9 वर्षीय मुली आणि 15 वार्षीय मुलाला महिनाभर उपवास ठेवणे इस्लामनुसार बंधनकारक असते, असे मौलाना काझमी म्हणाले.
सहेरी म्हणजे काय - उपवासासाठी पहाटे सूर्योदयापूर्वी जेवण करणे अनिवार्य आहे. त्याला सहेरी असे म्हणतात. एकदा सहेरी केल्यानंतर दिवसभर रोजा धारण करणारी मुस्लिम व्यक्ती कोणतेही अन्न खाऊ शकत नाही. पाण्याचे एक थेंबसुद्धा पिऊ शकत नाही. सायंकाळी सूर्यास्तानंतर रोजाचा कालावधी पूर्ण होतो. त्यावेळी खाता,पिता येते.
नागरिकांनी नियमांचे पालन करावे - मागील दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व धर्मियांना सण - उत्सव नियमावलीमध्ये साजरी करावी लागले. पण, यंदा निर्बंधमुक्त रमजान साजरा होणार आहे. पण, कोरोना अजूनही संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांनी ज्या काही सूचना दिल्या आहेत त्या सूचनांचा पालन करावे. तसेच नागरिकांनी या महिन्यात गोरगरिबांना मदत करावी, असे आवाहन यावेळी मौलाना शबी हसन काझमी यांनी केले.
हेही वाचा - Ramadan 2022 : रमजानचा चंद्र भारतात दिसला.. जामा मशिदीच्या शाही इमामांची घोषणा.. रोजा उद्यापासून सुरू