पुणे - देशासमोर सध्या कोरोनाचे महासंकट उभे आहे. हे संकट टाळण्यासाठी संपूर्ण देश मागील महिनाभरापासून लॉकडाऊन आहे. संपूर्ण व्यवहार ठप्प झाले आहेत. सर्वच क्षेत्राला याचा फटका बसला आहे. जनसामान्यांचे देखील काही प्रमाणात हाल होत आहे. अनेकांची लग्ने रद्द झाली आहेत, तर काहींची लग्ने लांबणीवर गेली आहे. मात्र, पुण्यात बुधवारी लॉकडाऊनच्या काळातही एक लग्न पार पडले. या लग्नात लॉकडाऊनचे संपूर्ण नियम पाळले गेले होते. त्यामुळे पोलिसांनीही या जोडप्याला सॅनिटायझर आणि हॅन्ड ग्लोव्हज देऊन त्यांचे स्वागत केले.
हेही वाचा... पुणे जिल्हयातील कोरोनाबाधितांची संख्या 1538, तर विभागातील आकडा 1702 वर
पुण्याच्या धनकवडीतील हर्षल पवार आणि कोंढवे येथील रेश्मा नलावडे यांचा विवाह कात्रज येथे संपन्न झाला होता. यावेळी दोन्हीकडील मोजकी मंडळी लग्नाला हजर होती. कोणतीही गर्दी न जमवता हे लग्न पार पडले. त्यानंतर नवरी सासरी नांदायला निघाल्यावर रस्त्यात पोलिसांनी ही गाडी अडवली. परंतु मोजक्या लोकांच्या उपस्थितीत, लॉकडाऊनचे नियम पाळून लग्न केल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनीही या नवविवाहित जोडप्याचं कौतूक केले. पोलिसांनी त्यांना सॅनिटायझर आणि हॅन्ड ग्लोव्हज भेट देऊन त्यांचे स्वागत केले.