पुणे- अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा अटकेत असलेल्या क्रुझ ड्रग्ज पार्टीत प्रकरणात किरण गोसावी हा पंच होता. या किरण गोसावीने विदेशात नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने अनेक तरुणांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
एनसीबीने आर्यन खानला अटक केल्यानंतर किरण गोसावीने त्याच्यासोबत सेल्फी काढला. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर गोसावी हा एनसीबीचा अधिकारी असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, गोसावीशी संबंध नसल्याचे एनसीबीने स्पष्ट केले.
किरण गोसावी याच्यावर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याबाबत चिन्मय देशमुख (वय २२) या तरुणाने २०१८ मध्ये पोलुसांकडे तक्रार दिलेली आहे. याप्रकरणी गोसावीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकारणाबाबत तक्रारदार चिन्मय देशमुख यांनी ईटीव्ही भारतला माहिती दिली आहे. चिन्मय देशमुख या तरुणाने सांगितले, की 2018 ला किरण गोसावी हा फेसबुकच्या संपर्कात आला. त्याने मलेशियात नोकरी लावण्यासाठी 3 लाखांची मागणी केली. त्यासाठी मुंबईत भेटायला बोलाविले. मात्र, त्याने फसवणूक केली. अशाच प्रकारे अनेकजणांची फसवणूक केली आहे. कदाचित तो आंतरराष्ट्रीय रॅकेट चालवित असावा. त्याची चौकशी करावी, जेणेकरून भविष्यात फसवणूक होणार नाही.
हेही वाचा-Aryan Khan Drug Case LIVE - माझ्याकडे दुसरी प्रकरणं देखील आहेत, वेळेत बाजू मांडा - न्यायमूर्ती
काय आहे नेमके प्रकरण?
2018 मध्ये गोसावी याने आपल्या फेसबुक अकाऊंटवर मलेशियात हॉटेलमध्ये नोकरीची संधी असण्यासंदर्भात पोस्ट टाकली होती. त्या पोस्टवर चिन्मय देशमुख या तरुणाने प्रतिसाद दिला होता. त्यांच्याकडून तीन लाख रुपये घेऊन गोसावीने त्याला मलेशियाला पाठविले. मात्र, तेथे नोकरी न दिल्याने तो भारतात परत आला. त्यानंतर त्याने फरासखाना पोलिसांकडे तक्रार दिली होती. या गुन्ह्यात गोसावी फरार आहे. त्यामुळे फसवणुकी संदर्भात फरासखाना पोलीस किरण गोसावीचा शोध घेत आहेत. तक्रारदार चिन्मय देशमुख याच्या माहितीनुसार गोसावीने आपल्यासह पालघर, मुंबई, आंध्र प्रदेश येथील अनेकांची नोकरीच्या आमिषाने फसवणूक केली आहे. दिल्लीतील तरुणांनाही त्याने फसविले आहे. त्यामुळे दिल्ली पोलीसही त्याच्या मागावर आहेत.
हेही वाचा-समीर वानखेडे मुस्लिमच; निकाह पढवणाऱ्या मौलानांचा दावा
किरण गोसावी विरोधात लुकआऊट नोटीस
सध्या संपूर्ण देशात गाजत असलेल्या आर्यन खान ड्रग्स केसमध्ये किरण गोसावी हा मुख्य साक्षीदार आहे. मात्र, गोसावी पुण्यातील एका गुन्ह्यात फरार आरोपी असल्याची बाब समोर आली आहे. गोसावी विरोधात पुणे पोलिसांनी लुकआऊट नोटीस जारी केली आहे. गोसावी सापडत नसल्याने त्याला पुणे पोलिसांनी फरार घोषित केले होते.
के. पी. गोसावी नेमका कोण?
व्हायरल झालेले कथित एनसीबी अधिकारी किरण गोसावी हा देशभरात, परदेशात नोकरी मिळवून देणाऱ्या के. पी. जी. ड्रीम्ज रिक्रूटमेंट कंपनीचे मालक असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे के. पी. जी. ड्रीम्ज कंपनीचे मुंबई आणि नवी मुंबईत कार्यालय आहे. बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात, खासगी गुप्तहेर अशीही के. पी. गोसावी याची ओळख आहे. गोसावी स्वत:च्या वाहनावर पोलिसांची पाटी लावून फिरताना कॅमेऱ्यात कैद असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय नवाब मलिक यांनीही तसा दावा केला आहे. आर्यन खानसह इतर जणांना अटक केलेल्या प्रकरणात किरण गोसावी हा पंच आहे.
हेही वाचा-समीर वानखेडेंचा 'निकाहनामा' समोर: 'स्वीट कपल' म्हणत नवाब मलिक यांचं नवीन ट्वीट
ड्रग्स प्रकरण उघडकीस आल्यानंतर किरण गोसावी याचा आर्यन सोबतचा सेल्फी व्हायरल झाला होता. यानंतर नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत किरण गोसावी याच्यावर आरोप करत एनसीबीच्या कारवाईवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते.
सध्या किरण गोसावी कुठे आहे?
मुंबईतील आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी साक्षीदार बनलेला किरण गोसावी लखनऊमध्ये शरण येणार आहे. लखनौमधील मडियाव पोलीस ठाण्यात शरण येणार असल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मडियाव पोलीस ठाण्यात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. किरण गोसावीचे शेवटचे लोकेशन लखनौ दिसत आहे. दरम्यान मडियाव पोलिसांनी गोसावी शरण असल्याच्या वृत्ताचे खंडण केले आहे.
फसवणुकीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या किरण गोसावीच्या महिला असिस्टंटला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. शेरबानो कुरेशी असे या महिला असिस्टंटचे नाव आहे. शेरबानो कुरेशीसह गोसावीने पुण्यातील तरुणाची तीन लाखांची फसवणूक केली होती.