पुणे - हिंजवडीच्या आयटी पार्कमध्ये टीसीएस कंपनीत कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. कपिल गणपत विटकर (वय ३९ रा. हडपसर) असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते फोन रिसेपनिस्ट असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, नातेवाईकांनी मात्र कपिल यांचा खून झाल्याचा संशय पोलिसांकडे व्यक्त केला आहे. त्यामुळे पोलीस देखील त्या दिशेने तपास करत आहेत. घटनास्थळी स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी आणि इतर अधिकाऱ्यांनी धाव घेतली होती.
हेही वाचा - घातवार; दिवसभरात तब्बल चार आत्महत्यांच्या घटना उघडकीस
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (मंगळवार) पहाटे सहाच्या सुमारास कपिल हे कामावर आले होते. काही दिवसांपासून त्यांनी सुट्टी घेतली होती. कपिल यांचं तिसऱ्या मजल्यावर ऑफिस आहे. परंतु, त्यांनी सहाव्या मजल्यावर जाऊन आत्महत्या केली. त्यांच्या गळ्याभोवती प्लास्टिक लॉक टॅग गुंडाळलेला होता. घटना उघडकीस आल्यानंतर हिंजवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
कपिल हे गेल्या काही दिवसांपासून पाठीच्या कण्याच्या दुखण्याने हैराण होते, असेही पोलिसांनी सांगितले आहे. अद्याप आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. कपिल यांनी सहाव्या मजल्यावर जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली जिथे सीसीटीव्ही कॅमेरे देखील नाहीत. त्यामुळे त्यांचा खून झाल्याचा संशय पोलिसांकडे कपिल यांच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यानुसार हिंजवडी पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत.