पुणे - सध्या पवित्र संकेतस्थळामार्फत करण्यात येत असलेली राज्यातील शिक्षकांची भरती आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्याचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयाकडून शासनाला सादर करण्यात आला आहे. यासाठी एमपीएससी समन्वयक समितीच्या माध्यमातून सतत पाठपुरावा करण्यात येत होता. आज आमच्या मागणीला यश येताना दिसत आहे. यामुळे येथून पुढे होणाऱ्या सर्व शिक्षक भरती पारदर्शक होतील, असा विश्वास यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केलं आहे.
भरती प्रक्रिया एमपीएससीमार्फत - शिक्षकांची भरती प्रक्रिया एमपीएससीमार्फत राबवण्यासाठी काही तांत्रिक बदल आवश्यक असून, या बदलांची पूर्तता करून पुढील शिक्षक भरती एमपीएससीमार्फत होण्याची शक्यता आहे. आयोगाच्या या प्रस्तावाचा विद्यार्थी संघटनेच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे. आत्ता शिक्षकांची भरती देखील पारदर्शक पद्धतीने होणार असल्याचे यावेळी विद्यार्थी संघटनेच्या माध्यामातून सांगण्यात येत आहे.
2012 मध्ये शिक्षक भरतीवर बंदी - राज्यात 2012 मध्ये शिक्षक भरतीवर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे राज्यातील सरकारी शाळांमध्ये शिक्षकांची पदे मोठय़ा प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे शिक्षक भरतीची मागणी राज्यभरातील उमेदवारांकडून सातत्याने करण्यात येत असल्याने 2019 मध्ये 12 हजार पदांची भरती पवित्र संकेतस्थळा मार्फत सुरू करण्यात आली. भरती प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने होण्यासाठी पवित्र संकेतस्थळ विकसित करण्यात आले होते. या प्रक्रियेत अनेक तांत्रिक अडचणी उद्भवल्याने ही प्रक्रिया लांबली आहे. सध्या खासगी अनुदानित संस्थांतील शिक्षकांची पदे मुलाखतीद्वारे भरण्याचा टप्पा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता एमपीएससीमार्फत शिक्षकांची भरती प्रक्रिया राबवण्याचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयाकडून शासनाला सादर करण्यात आला आहे.