पुणे - वीज कंपनी प्रशासनाच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्यावतीने रास्ता पेठ येथे निषेध सभा आयोजित करण्यात आली होती. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास येत्या 20 ऑक्टोबरला मुंबई येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करू, असा इशारा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्यावतीने देण्यात आला आहे.
'... तर आंदोलन करु'
महाविकास आघाडी सरकारच्या काळात वीज सारख्या अत्यंत महत्वाच्या अशा उर्जा खात्याकडून उर्जामंत्री व वीज कंपनी प्रशासनाकडून 40,000 कंत्राटी कामगारांच्या दैनंदिन समस्यांकडे अक्षम्य असे दुर्लक्ष झाले आहे. मागील 2 वर्षात ऊर्जामंत्र्यांनी आपल्या खात्यातील वीज कंत्राटी कामगारांच्या समस्या किमान जाणून घेण्याची सुद्धा तसदी घेतली नसल्याचे सांगत निषेध सभा घेण्यात आली. यात महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनीतील सर्व लाइनमन, उपकेंद्र सहाय्यक, लिपिक, कॉम्प्युटर ऑपरेटर, मीटर रीडर, शिपाई, सुरक्षा रक्षक, महानिर्मिती कंपनीतील सर्व पदाचे कामगारांनी रास्ता पेठ पॉवर हाऊस महावितरण कार्यालयासमोर द्वार सभा घेऊन निषेध नोंदवला. ऊर्जा हा शब्द सकारात्मक आहे. मात्र राज्याचे ऊर्जामंत्री नकारात्मक वागत आहेत. त्यामुळे असे असंवेदनशील नकारात्मक ऊर्जामंत्री आम्हाला नकोत, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली. राज्यातील कामगारांचे प्रश्न न सुटल्यास ऐन सणासुदीच्या काळात सर्व कंत्राटी कामगार हे मुंबई येथील मुख्यालय येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करतील, असा इशारा संघटने तर्फे देण्यात आला आहे.
हेही वाचा - तब्बल आठ तासांनंतर सीबीआयचे पथक अनिल देशमुख यांच्या घराबाहेर पडले