पुणे - पुणे महानगर (Pune Municipal) क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) (PMRDA) एल ॲण्ड टी कंपनीकडून तयार करून घेतलेल्या ‘सर्वंकष वाहतूक आराखड्यात’ सुमारे १९५.२६ किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग (Metro Route) प्रस्तावित करण्यात आले आहेत. पुणे महापालिकेचे दोन आणि पीएमआरडीएने हाती घेतलेला एक अशा तीन मेट्रोमार्गांव्यतिरिक्त नव्याने सहा असे एकूण नऊ मार्गांचा (Nine Route) त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये आता महामेट्रोने ८२.५ किलोमीटर लांबीचे नव्याने सात मार्ग सूचविले आहेत. या सात मार्गांचे अहवाल तयार करण्यास परवानगी देण्याची विनंती पीएमआरडीएकडे पत्राद्वारे केली आहे
वाहतुकीचा आराखडा तयार करून पीएमआरडीएला सादर
पीएमआरडीएने सात हजार २०० चौरस किलोमीटर हद्दीचा ‘सर्वंकष वाहतूक आराखडा’ (सीएमपी) तयार करण्याचे काम ‘एल ॲण्ड टी’ कंपनीला दिले आहे. या कंपनीने पहिल्या टप्प्यात दोन हजार चौरस किलोमीटर लांबीच्या परिसरातील वाहतुकीचा आराखडा तयार करून पीएमआरडीएला सादर केला आहे. तर वाहतूक सुरळीत आणि गतिमान करण्यासाठी सुमारे ६६ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. त्यामध्ये मेट्रो प्रकल्पांचाही समावेश आहे.
काम २०३८ पर्यंत पूर्ण करण्याची शिफारस
पुणे महापालिकेने पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन मार्गांचे काम हाती घेतले आहे. तर हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान मेट्रो प्रकल्पाचे काम पीएमआरडीएने हाती घेतले आहे. सर्वंकष वाहतूक आराखड्यात या मार्गांचे विस्तारीकरणाबरोबरच नव्याने सहा मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. हे मार्ग दोन टप्प्यांत उभारण्याचे नियोजन असून २०३८ पर्यंत ते पूर्ण करण्याची शिफारस या अहवाल करण्यात आली आहे.
पीएमआरडीएकडून ‘सीएमपी’ तयार
प्राधिकरणाने हिंजवडी ते शिवाजीनगर पाठोपाठ आठ मार्गांवर मेट्रो प्रकल्पाचे जाळे उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी कोणत्या मार्गावर हे प्रकल्प राबविता येतील, या संदर्भातील पूर्वसुसाध्यता (प्री फिजीब्लिटी रिपोर्ट) तयार करून घेण्यासाठी दिल्ली मेट्रो या कंपनीला काम दिले होते. त्यासाठी अर्थसंकल्पात पंधरा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, प्राधिकरणाने त्यांच्या हद्दीचा सर्वंकष वाहतूक आराखडा तयार करावा. त्यानंतर मेट्रोचे जाळे निश्चित करावे, असे दिल्ली मेट्रोकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार पीएमआरडीएकडून ‘सीएमपी’ तयार करून घेण्यात आला आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यातील या अहवालात १९५ किलोमीटर लांबीचे मेट्रोचे जाळे उभारण्यासाठी नऊ मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत.असे असतानाच महामेट्रोने पीएमआरडीएला पत्र पाठवून नवीन सात मेट्रो मार्ग प्रस्तावित केले असून त्यांचे सर्वेक्षण करण्यास परवानगी मागितली आहे. पीएमआरडीएने हे पत्र एल ॲण्ड टी कंपनीला पाठविले असून त्यांच्याकडून यामार्गांचे तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सातपैकी स्वारगेट ते हडपसर या मार्गाचे सर्व्हेक्षण यापूर्वीच झाले आहे. तर महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला एचसीएमटीआर मार्गावर देखील मेट्रो प्रकल्प राबविता येईल का, यांची चाचपणी या निमित्ताने होणार असल्याचे सांगितले आहे.
असे आहेत ते सात मार्ग
एल ॲण्ड टी कंपनीने सुचविलेले मार्ग पहिला टप्पा (एकूण लांबी कि.मी.मध्ये)३३.६३ - निगडी ते कात्रज, २५.९९ - चांदणी चौक ते वाघोली, २३.३३ - हिंजवडी ते शिवाजीनगर, ११.१४ - शिवाजीनगर ते हडपसर, ३०.०८ - हिंजवडी ते चाकण, दुसरा टप्पा ९.०८ - सिंहगड रस्ता- वीर बाजी पासलकर ते पुणे कँटोन्मेंट, ८.८७ - वारजे ते स्वारगेट, ३५.२३ - वाघोली-पवार वस्ती ते हिंजवडी, १७.८१ - चांदणी चौक ते हिंजवडी, महामेट्रोकडून नव्याने सुचविण्यात आलेले मार्ग १.५ - वनाज ते चांदणी चौक, १२ - रामवाडी ते वाघोली, ५ - हडपसर ते खराडी, ७ - स्वारगेट ते हडपसर, १३ - खडकवासला ते स्वारगेट, ५ - एसएनडीटी ते वारजे, ३६ - एमसीएमटीआर (वर्तुळाकार मार्ग)