पुणे - महापालिकेत 23 गावांच्या समावेशाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या संदर्भातील अध्यादेश जारी करण्यात आला आहे.गेल्या काही वर्षापासून पुणे महापालिका शेजारील 23 गावांचा समावेश पुणे महापालिकेत करण्याबद्दलची प्रक्रिया रखडली होती. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
विकासासाठी राज्य सरकारने निधी द्यावा-
पुणे महानगरपालिकेमध्ये एकाच वेळेस 23 गावे समाविष्ट करण्याचा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. मात्र, एकाच वेळी २३ गावे समाविष्ट करण्यास महापालिकेतील सत्ताधारी भाजपचा विरोध होता. टप्प्याटप्प्याने ही गावे महापालिकेत समाविष्ट करावीत, असे भाजपचं म्हणणे होते. समाविष्ठ गावांचा एकाचेळी विकास करणे महापालिकेला शक्य नाही. त्यामुळे सरकारनेच आता विकास निधी द्यावा, अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली आहे.
तत्कालीन सरकारने रेंगाळत ठेवला विषय-
मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस तसेच शिवसेनेचा एकाच वेळेस 23 गावे समाविष्ट करायला पाठिंबा होता. अखेर राज्य सरकारच्या अध्यादेशानंतर एकाच वेळेस 23 गावे ही महानगर पालिकेत समाविष्ट होणार आहेत. या समावेशाकरता आग्रही असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या पदाधिकारी, नगरसेवक यांच्यात आनंदाचे वातावरण असून या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. तत्कालीन राज्य सरकारने याबाबत ठोस निर्णय न घेतल्याने अनेक वर्षापासून हा प्रस्ताव प्रलंबित होता.
मुंबई महापालिकेपेक्षा मोठी होणार पुणे महानगरपालिका-
या निर्णयामुळे पुणे महापालिकेवर मुलभुत सोयीसुविधा देण्याकरता ताण वाढणार आहे. याकरीता मोठ्या प्रमाणात अधिकारी, कर्मचारी यांची संख्या वाढवावी लागणार आहे, ही तेवीस गावे महापालिका हद्दीत समाविष्ट झाल्यानंतर पुणे शहराच्या लोकसंख्येत आधीच्या लोकसंख्येपेक्षा तीस टक्क्यांनी भर पडणार आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेपेक्षा ही पुणे महापालिका आता मोठी होणार आहे.