पुणे - भारतीय क्रिकेटला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या महेंद्रसिंग धोनीच्या महेंद्रसिंह धोनी क्रिकेट अकॅडमीचे पुण्यात आगमन होत आहे. धोनी क्रिकेट अकॅडमी पुण्यातील अग्रगण्य क्रिकेट मास्टर्स अकॅडमीसोबत संलग्न झाली आहे. क्रिकेट मास्टर्स अकॅडमी आणि धोनी क्रिकेट अकॅडमी एकत्रितपणे पुण्यातील युवा क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करण्यासाठी सज्ज झाले असून या अकॅडमित 1 जानेवारी 2021पासून प्रशिक्षण सुरू होणार आहे, अशी माहिती महेंद्रसिंह धोनी क्रिकेट अकॅडमीचे संचालक आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू डेरील कलीनन यांनी दिली.
आधुनिक पद्धतीने सराव आणि सर्वत्तम प्रशिक्षण
सध्याच्या स्पर्धात्मक क्रिकेटयुगात पुण्यातील युवा क्रिकेटपटूंना जास्तीत-जास्त आधुनिक पद्धतीने सराव मिळावा आणि सोबतच क्रिकेटमधल्या नवनवीन पद्धतीने सर्वत्तम प्रशिक्षण मिळावे, म्हणून क्रिकेट मास्टर्स अकॅडमी आणि एम. एस. धोनी क्रिकेट अकॅडमीच्या सहकार्याने प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती ही यावेळी कलीनन यांनी दिली.
प्रत्येक बॅचेसमध्ये 20 खेळाडूंचा सहभाग
महेंद्रसिंह धोनी क्रिकेट अकॅडमित वयाच्या 10 वर्षांपासूनच्या मुलांचा सहभाग असणार आहे. प्रत्येक वयाच्या मुलांची 20 खेळाडूंची बॅच असणार आहे. पुणे शहराबरोबरच जिल्ह्यातील मुलांचाही सहभाग यात होणार आहे. आठवड्यातून दोन दिवस खेळाडूंची आपापसात स्पर्धा होणार आहे.
2013मध्ये स्थापना
क्रिकेट मास्टर्स अकॅडमीची स्थापना 2013मध्ये क्रिकेटचा सर्वांगीण विकास हा मुख्य दृष्टीकोन समोर ठेऊन झाली. 5 ते 19 वर्ष वयोगटातील मुला-मुलींसाठी क्रिकेटचे प्रशिक्षण येथे मिळते. एम. एस. धोनी क्रिकेट अकॅडमीशी संलग्न झाल्याचा आम्हाला आनंद झाला आहे, अशी माहिती अकॅडमीचे गजेंद्र पवार यांनी यावेळी दिली. यावेळी रणजी खेळाडू बाबुराव यादव, ओनेल नोह, सोहेल रौफ, गजेंद्र पवार आदी मान्यवर उपस्थित होते.