पुणे - शहरात सर्वप्रथम कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या भवानी क्षेत्रीय कार्यालय परिसरात रुग्णांचा वेग अखेर आटोक्यात येत आहे. महापालिकेने जाहीर केलेल्या 8 जुलैपर्यंतच्या आकडेवारीनुसार भवानी पेठेत सर्वात कमी म्हणजे केवळ 177 अॅक्टिव्ह रुग्ण असून 1 हजार 17 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर ढोले-पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात सर्वाधिक 762 अॅक्टिव्ह रुग्ण असून, 1 हजार 756 रुग्ण बरे झाले आहेत.
लॉकडाऊनच्या सुरूवातीला औंध, बाणेर, बालेवाडी, सिंहगड रस्ता भागात कोरोना रुग्णांची संख्या अगदी बोटावर मोजण्याइतकी होती. मात्र, लॉकडाऊन शिथील केल्यानंतर या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. शहरात सर्वाधिक रुग्ण ढोले-पाटील क्षेत्रीय कार्यालयात 762 असून, त्यानंतर सिंहगड रस्ता 676, बिबवेवाडी 674, वारजे-कर्वेनगर 643, हडपसर-मुंढवा येथे 573, धनकवडी-सहकारनगर 565, शिवाजीनगर-ढोले-पाटील रोड येथे 550, कसबा-विश्रामबागवाडा येथे 457, नगर रोड-वडगांव शेरी येथे 382, वानवडी रामटेकडी येथे 374, येरवळा-कळस येथे 338, औंध बाणेर 313, कोंढवा-येवलेवाडी 296, कोथरूड-बावधन 276 आणि भवानी पेठ येथे 177 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.
लॉकडाऊन शिथिल होण्यापूर्वी सिहंगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या परिसरात केवळ 12 रुग्ण होते. मात्र, शिथिलतेनंतर या क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत 676 रुग्ण उपचार घेत आहे. कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सर्वाधिक 1 हजार 883 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.