पुणे: ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आज अचानक पुण्यातील स्वारगेट आगारातील (Swargate Bus Stand) गाड्यांमधील डिझेल संपल्याने स्वारगेट येथील एसटी महामंडळाच्या कार्यालयाबाहेर बसेसच्या लांब रांगा पाहायला मिळाल्या. डिझेलच्या कमतरतेमुळे फेऱ्या रद्द झाल्याने एसटीचं हजारो रुपयांचं नुकसान झालं आहे.
लांब पल्याच्या गाड्या रद्द: पुण्यातील स्वारगेट येथून सकाळच्या सत्रात लांब पल्ल्याच्या गाड्या राज्यातील विविध ठिकाणी जात असतात. पण आज सकाळी जेव्हा या गाड्या डिझेल भरण्यासाठी आगारातील पंपावर गेल्या असता पंप चालकाकडून डिझेल संपलं आहे, असे सांगण्यात आले. त्यामुळे सकाळच्या सत्रातील सर्वच लांब पल्याच्या गाड्या रद्द करून महामंडळाच्या कार्यालयाबाहेर लावण्यात आल्या आहेत.
चालक काय म्हणाले: याबाबतीत बस चालकांशी बातचीत केली असता ते म्हणाले, "आज सकाळी जेव्हा आम्ही डिझेल भरण्यासाठी आगारातील पंपावर आलो तेव्हा आम्हाला पंपावरील डिझेल संपलेला आहे असे कळाले. त्यामुळे आमच्या सकाळच्या सत्रातील गाड्या रद्द केल्या गेल्या. पेट्रोल पंप चालकांचे पैसे थकीत असल्यामुळे त्यांनी डिझेल भरल्यास नकार दिला आहे. त्यामुळेच आम्ही आमच्या गाड्या डेपोमध्ये लावत आहोत."