पुणे - स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे इंग्रजांना आत्मविश्वासाने आणि धाडसाने सांगणारे व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ( Lokmanya Bal Gangadhar Tilak ) यांची आज जयंती. लोकमान्य टिळकांच्या जयंतीच्या निमित्ताने पुण्यातील केसरी वाडा विषयी माहिती पाहूया.. पुण्याच्या केळकर रस्त्यावर नारायण पेठ येथे आहे केसरी वाडा. पुर्वी हा वाडा गायकवाड वाडा म्हणून ओळखल जात होत. पण पुढे ही वास्तू लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या वास्तव्याने केसरी वाडा म्हणून ओळखली जाऊ लागली. हा वाडा लोकमान्य टिळकांनी 1905 साली विकत घेतला. त्यावेळी केसरी व मराठा या वृत्ततपत्रांची कार्यालयेही या वाड्यात हलवली. टिळकांनी स्थापन केलेल्या केसरी वृत्तपत्राचे कार्यालयही याच वाड्यात आहे. याच वाड्याला टिळक वाडा अथवा केसरी वाडा असेही म्हणतात.

इ.स. १९०५ मध्ये टिळकांनी खरेदी केला केसरी वाडा - इ.स. १९०५ मध्ये बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड ( Sayajirao Gaikwad ) यांच्याकडून नारायण पेठेतील ( Narayan Peth ) हा वाडा केसरीच्या कचेरीसाठी आणि निवासासाठी लोकमान्य टिळकांनी विकत घेतला. पश्चिमेचा भाग केसरीचे ऑफिस आणि छापखाना व पुर्वेकडील भाग निवास अशी त्याची व्यवस्था केली. मधील मोकळ्या पटांगणात गणेशोत्सवातील कार्यक्रम आणि विविध सभा, समारंभ आजही होतात. निवासासाठीचा भाग त्यांनी स्वतः आराखडा तयार करुन आपल्या सोईप्रमाणे बांधून घेतला. इमारतीच्या डाव्या बाजूच्या खोलीत त्यांची अभ्यासिका आहे. याच अभ्यासिकेतून त्यांनी केसरीचे अग्रलेख संपादीत केले. अनेक महत्वाच्या व्यक्तींच्या भेटी गाठी, स्वातंत्र्यलढ्याची दिशा ठरविण्याचे काम याच अभ्यासिकेत झाले.लोकमान्यांच्या हयातीत त्यांच्या समोर बसून तयार केलेला पुर्णाकृती पुतळा या अभ्यासिकेत स्थापित केला आहे. १०० वर्ष जुन्या या वास्तुच्या जिर्णोद्धाराचे काम टिळक कुटुंबियांनी सन २०१९ मध्ये हाती घेतले. पूर्वी जसा होता तसाच वाडा याठिकाणी बांधण्यात आल आहे.
असे आहे केसरी वाडा - केसरी वाड्यात आत आल्या नंतर मध्ये मोकळ पटांगण आहे. या मधल्या मोकळ्या पटांगणात गणेशोत्सवातील कार्यक्रम आणि विविध सभा, समारंभ आजही होतात. समोर संग्राहलय आहे. संग्रहालयात प्रवेश करण्यापूर्वी बाहेरचा टिळकांचा तेजस्वी पूर्णाकृती पुतळा नजरेस पडतो. त्यापुढे गणपतीची धातुमूर्ती आहे. आणि शेजारी जिन्याजवळ 'केसरी'चे जुने छपाईयंत्र ठेवलेले दिसते. हाताने फिरवून केसरीचे पहिले अंक त्या यंत्रावर छापले गेले होते.आणि आजही या ठिकाणी केसरी च वृत्तपत्र छापलं जात आहे.

हेही वाचा - Nanda Khare passed away : ज्येष्ठ लेखक, कादंबरीकार नंदा खरे यांचे निधन

टिळकांच्या आठवणीचा साठा - केसरी वाड्यात डाव्याबाजूला टिळकांचा जूना वाडा आहे. समोर लोकमान्य टिळकांनी सुरू केलेलं गणेशोत्सव म्हणजेच मानाचा पाचवा गणपती या ठिकाणी बसलेलं असते. गणेशोत्सवात आजही विविध कार्यक्रमात या समोरच्या बाजूला असलेल्या पटांगणात होत असतात. वरच्या मजल्यावरील संग्रहालयात लोकमान्यांच्या वापरातील वस्तू, फोटोज, त्यांना मिळालेली मानपत्र, त्यांचे हस्ताक्षर, त्यांच्या रक्षा, अस्थिंचा अंश अशा अनेक गोष्टी जपून ठेवल्या आहेत. श्री. सुहास बहुलकर यांनी काढलेलं टिळकांचे पूर्णाकृती तैलचित्र, शिसवीच्या लाकडात कोरीवकाम असलेले टेबल ज्याच्यावर काचेच्या पेटीत चंदनाच्या डबीत लोकमान्यांच्या रक्षा अस्थींचा अल्पांश ठेवलेला आहे. भारतीय ध्वज परंपरेतील महत्वाचा असा ध्वज जो मादाम कामा यांनी २२ ऑगस्ट १९०७ रोजी जर्मनीतील स्टुटगार्ड येथे आपल्या भाषणापुर्वी फडकवला होता, तो इथे जपून ठेवलेला आहे.

येथे पहता येतात टिळकांची चित्रे - रत्नागिरीमधील लोकमान्य टिळकांच्या जन्मघराचा फोटो, त्यांच्या राजकीय-सांस्कृतिक, कौटुंबिक जीवनांतील काही फोटो, त्यांना मिळालेली अनेक मानपत्रे, चांदीचे करंडक, टिळकांची अनेक चित्रकारांनी काढलेली चित्रे, लोकमान्यांचे सुविचार, विचारधन स्पष्ट करणाऱ्या ओळी, इतरही काही नेत्यांची पत्रे, लोकमान्यांच्या जन्मशताब्दी निमित्त भारतीय पोस्ट खात्याने काढलेले दुर्मीळ टपाल तिकिट, नाणे, लोकमान्यांच्या मुंबईतील अंत्ययात्रेचे दर्शन घडवणारी क्षणचित्रे, मुंबईच्या चौपाटीवरील टिळक पुतळा, पुण्याच्या मंडईतील टिळक पुतळा यांची चित्रे येथे पाहायला मिळतात. ब्रिटिश संसदेत भारतीय स्वातंत्र्याचे विधेयक मंजूर होताच, त्याच्या प्रतीवर केसरीचे लंडनमधील तत्कालीन प्रतिनिधी श्री. द. वि. ताम्हनकर यांनी इंग्लंडचे पंतप्रधान अॅटली यांची स्वाक्षरी घेतलेली प्रतही इथे पाहायला मिळते.
केसरी वाड्यात आजही लोकमान्य टिळकांची सातवी पिढी राहत आहे. पुण्यातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठच्या ( Tilak Maharashtra University ) माध्यमातून त्यांचा वारसा चालवली जाते. स्वतंत्र चळवळीत पुण्यातील या केसरी वाड्याचे अनेक आठवणी असून स्वतंत्रसैनिकाच्या याच वाड्यात स्वतंत्र चळवळीसाठी बैठका होत असत.