पुणे - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत पालकमंत्री अजित पवार यांनी तातडीने पुण्यात दोन जम्बो कोविड सेंटर उभे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, प्रशासनाने नियोजन करत दिनांक १९ ऑगस्टला दोन्ही कोविड सेंटर पूर्ण होतील, अशी डेडलाईन दिली होती. मात्र, सततच्या पावसामुळे सदर कोविड सेंटरच्या उभारणीला विलंब होत आहे. त्यामुळे, आता १९ ऑगस्ट नव्हे तर २२ ऑगस्टला दोन्ही जम्बो कोविड सेंटर सुरू होतील, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे.
हेही वाचा - राज्यात दिवसभरात ८ हजार ४९३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद, ओलांडला 6 लाखांचा टप्पा
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुण्यात दोन जम्बो कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जम्बो कोविड सेंटर बांधण्यासाठी जवळपास 200 कोटी खर्च येणार आहेत. महापालिका आणि राज्य शासन हे एकत्रितरित्या हा खर्च करणार आहेत. सध्य परिस्थितीत या दोन्ही जम्बो कोविड सेंटरचे काम सुरू आहे.
यातील एक कोविड सेंटर पुणे इथे, तर दुसरे पिंपरी चिंचवड येथे उभे राहत आहे. पुण्यातील सीओईपी हॉस्टेलच्या मैदानावर एका जम्बो कोविड सेंटर बांधण्याचे काम सुरू असून त्याचे काम उद्या 19 तारखेला पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, पुण्यात गेल्या आठवडाभर पडत असलेल्या पावसाने हे काम पूर्ण होऊ शकलेले नाही.
सीओईपी येथे होत असलेल्या जम्बो कोविड हॉस्पिटलचे काम युद्ध पातळीवर सुरू असून यासाठी चार वेगवेगळ्या संस्था काम करत आहे. पावसामुळे काही अडथळे येत असून लवकरात लवकर ही कोविड सेंटर उभी केली जातील आणि रुग्णांवर उपचार सुरु होतील. येत्या 22 ऑगस्टला या दोन्ही कोविड सेंटरचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.