पुणे- पिंपरी-चिंचवड शहरातील नवी सांगवीमध्ये चोरट्याने 5 लाख 81 हजारांच्या 23 तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. त्याचबरोबर 40 हजार रोख रक्कमदेखील घरातून पळवल्याची घटना समोर आली आहे. चोरट्याने एकूण 6 लाख 21 हजारांचा ऐवज चोरट्याने चोरून नेला आहे.
संगीता अजित कांकरिया (वय-52 रा.नवी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी सांगवी परिसरात राहणाऱ्या संगीता अजित कांकरिया यांच्या राहत्या घरातून चोरी झाली आहे. अज्ञात चोरट्याने घरात कोणी नसताना उघड्या दरवाजावाटे प्रवेश करत बेडरूमधील लाकडी कपाटातील दागिने आणि रोख रक्कम लंपास केली आहे. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, तक्रारदार संगीता यांना ओळखीतील व्यक्तीने सोन्याचे दागिने चोरले असल्याचा संशय असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी माहिती दिली आहे.